प्रतिनिधी / मसुरे:
परराज्यात जाण्यासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दाखला मिळविण्याकरिता मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मंगळवारी एकूण 115 परप्रांतीय वाळू कामगारांनी वैद्यकीय तपासणी केली. बुधवारी सायंकाळपर्यंत सुमारे 80 पेक्षा जास्त कामगारांनी तपासणी केली. उत्तरप्रदेश, बिहार या राज्यातील वाळू काढण्यासाठी आलेले हे कामगार असून बांदिवडे, कोईल, मसुरे सैय्यद जुवा, मालोंड येथे हे कामगार वास्तव्यास आहेत.
या सर्व कामगारांची ताप, सुखा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे याबाबतची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी व डॉ. तृप्ती देसाई यांनी करून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले. संचारबंदी सुरू असतानाही शासनाने परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी सोडण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्या करिता काही अटी-शर्ती ही शासनाने ठेवल्या आहेत. यात ज्यांना गावी जायचे आहे, अशा कामगारांकडे शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयाचे फिटनेस सर्टिफिकेटस असणे गरजेचे आहे. लॉकडाऊन आणखी वाढल्यास पावसाळय़ापूर्वी गावी जाता येणार नाही, या भीतीने परप्रांतीय वाळू कामगार वैद्यकीय तपासणी, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी रणरणत्या उन्हात पायी फिरत असल्याचे चित्र या निमित्ताने दिसत आहे.