निवडणूक निकालानंतर न्यू गांधीनगर येथे घडली घटना
प्रतिनिधी /बेळगाव
निवडणूक निकालानंतर वॉर्ड क्रमांक 37 मधील पराभूत महिला उमेदवाराच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. दगडफेक, धक्काबुक्कीत चौघेजण किरकोळ जखमी झाले असून यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हिनाकौसर अब्दुलरौफ मकानदार (वय 31) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अजिम पटवेगार, बाग्गा, बाबा अत्तार, पत्या, हमाल मुस्ताक दावणगेरे, आयुब, बाशा अंकलगी यांच्यासह आणखी काही जणांविरुद्ध भा.दं.वि. 427, 109, 506, 231, 143, 147, 148, 149, 448, 451, 307, 323, 304, 354 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गुलाबशा गल्ली, दहावा क्रॉस-गांधीनगर येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. हिनाकौसरची आई सलीमाबी मोहम्मदरफीक कपरट्टी उर्फ गोकाकवाले या वॉर्ड क्रमांक 37 मध्ये निवडणुकीला उभ्या होत्या. निकालानंतर त्यांच्या घरावर दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. अब्दुलमुनाफ (वय 31), अरशान (वय 6), हिनाकौसर (वय 31), अर्ष (वय 12) हे चौघेजण मारहाणीत जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहेत.
बंदोबस्त वाढविला
न्यू गांधीनगर येथील घटनेनंतर शहर व उपनगरांत बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खासकरून संवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. आšामनगर परिसरातही निकालानंतर तणावाची स्थिती होती. मात्र या परिसरातही गस्त वाढविण्यात आली.