प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार : बेळगाव विभागाला दोन दिवसात 40 लाखाचा फटका
प्रतिनिधी / बेळगाव
सहावा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी परिवहनच्या कर्मचाऱयांनी पुकारलेला संप दुसऱया दिवशीही सुरू आहे. त्यामुळे बससेवा ठप्पच आहे. परिणामी प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वेतनवाढ आणि परिवहन कर्मचाऱयांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा देण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. या कारणास्तव परिवहन कर्मचाऱयांनी बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.
प्रशासनाने खासगी वाहतुकीला परवानगी दिल्याने खासगी वाहने बसस्थानकात थांबवून प्रवाशांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे बसस्थानकात परिवहनच्या बस दिसत नसल्या तरी खासगी वाहनांची वर्दळ वाढली होती. बस बंद राहिल्याने प्रवाशांनी रिक्षा, मिनी बस, मॅक्सी कॅबचा आधार घेत प्रवास केला. काही प्रवाशांना चालत जात कामावर पोहोचावे लागले. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना तेंड देत प्रवास करावा लागल्याचे दिसून येत आहे.
परिवहन कर्मचाऱयांनी डिसेंबर महिन्यात विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन छेडले होते. बसस्थानकात ठाण मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, कर्मचाऱयांच्या 11 मागण्यांपैकी 7 मागण्या मान्य झाल्या होत्या. मात्र, उर्वरित मागण्या मान्य न झाल्याने कर्मचारी बुधवारपासून अनिश्चित काळासाठी संपावर गेले आहेत.
गुरुवारी सकाळपासून बसस्थानकात प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागले. त्यामुळे शासनाने तातडीने कर्मचाऱयांच्या मागणीवर तोडगा काढून बससेवा सुरळीत करावी, अशी मागणीही प्रवासीवर्गातून होत आहे.
बस बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने खासगी वाहनांची पर्यायी व्यवस्था केली आहे. मात्र, काही खासगी वाहनधारकांकडून जादा भाडे आकारणी केली जात आहे. बस बंदचा फायदा काही खासगी वाहन चालक उठवताना दिसत आहेत. शिवाय प्रवासीही वेळेत पोहोचण्यासाठी मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करत आहेत.
दोन दिवसात बेळगाव विभागाला तब्बल 40 लाखाचा फटका
परिवहन कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या दोन दिवसात बेळगाव विभागाला तब्बल 40 लाखाचा फटका बसला आहे. बसस्थानकातून दररोज लांब पल्ल्यासह स्थानिक बस व वातानुकूलित बस विविध मार्गांवर धावत असतात. त्यामुळे बेळगाव विभागाला दररोज 20 लाखापर्यंत महसूल मिळत असतो. मात्र, गेल्या दोन दिवसात सर्व बस जागेवर थांबून असल्याने परिवहनला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. आधीच कोरोनामुळे परिवहनचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच सध्या कर्मचाऱयांच्या संपामुळे परिवहनच्या तोटय़ात भर पडली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, या ठाम निर्णयावर कर्मचारी असल्याने हा संप अधिक तीव्र होताना दिसत आहे.
लांब पल्ल्यासह स्थानिक बसेस ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहेत. काही गावांना खासगी वाहतुकीची सोय नसल्याने प्रवाशांना चालत प्रवास करावा लागत आहे. शिवाय शहराकडे येणाऱया प्रवाशांना दुचाकी व इतर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. बाजारपेठ व शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी झालेली आहे.
चौकट शुक्रवारीही बससेवा बंद राहणार
विविध मागण्यांसाठी परिवहनच्या कर्मचाऱयांनी कामबंद संप पुकारला आहे. दुसऱया दिवशीही कर्मचारी बससेवेत हजर झाले नाहीत. कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने बेमुदत संपाचा तिढा अद्याप संपला नाही. त्यामुळे शुक्रवारीदेखील बससेवा बंद राहणार आहे.
चौकट खासगी वाहनांसाठी अच्छे दिन
दुसऱया दिवशी संप सुरू असल्याने खासगी वाहनांसाठी अच्छे दिन आले आहेत. विविध रस्त्यांवर रिक्षा, मिनी बस, मॅक्सी कॅब धावताना दिसत आहेत. बससेवा ठप्प झाल्याने खासगी वाहने बसस्थानकात थांबून प्रवाशांना सेवा पुरवत आहेत. त्यामुळे बसस्थानकात बसची वर्दळ थंडावलेली असली तरी खासगी वाहनांची वर्दळ वाढली आहे.