19 – 22 जुलै रोजी होणार दहावीची परीक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
दहावीची परीक्षा दि. 19 व 22 जुलै रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व जिल्हय़ातील परीक्षा केंद्रांबाहेर जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. बेळगाव शहर व तालुक्मयासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन व जिल्हय़ासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. काही पालक व शिक्षण संस्थांनी परीक्षाच रद्द व्हावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका रद्द करून परीक्षा घेण्यास अनकुलता दर्शविली होती.
दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांपासून 200 मीटर अंतरापर्यंत सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांचे सक्तीने पालन करावे. परीक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरापर्यंत केवळ विद्यार्थी, कर्मचारी, अधिकाऱयांनाच प्रवेश आहे. परीक्षा केंद्राजवळ असणारी झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
परीक्षा केंद्राजवळ कोणत्याही सभा, बैठका घेण्यास बंदी असणार आहे. जमावबंदीमुळे पाचहून अधिक जणांनी गटागटाने फिरू नये, घातक हत्यारे आणू नयेत, परीक्षा केंद्राजवळ कोणीही घोषणाबाजी करू नये, ध्वनीक्षेपकाचा वापर करू नये, वाद्य वाजविणे, गाणी म्हणणे यालाही बंदी असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱयांनी आपल्या आदेशात दिला आहे.