डागडुजीनंतर पळसंबेचा बावडेकर राजवाडा ठरतोय पर्यटकांचे प्रमुख आकर्षण
प्रतिनिधी / गगनबावडा
शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार; पळसंबेचा बावडेकर राजवाडा, अशी राज्यभर प्राचिन ओळख असलेल्या ठिकाणाचे संस्थेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी नुतनीकरण केले आहे. पर्यटक आणि इतिहासप्रेमी यांच्या सोईसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते येथील काजवा रेस्टॅरंटचे गतवर्षी उद्घाटन केले होते. काही दिवसांपासून येथे पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
नैसर्गिक सृष्टी सौंदर्य, सह्याद्रीच्या डोंगररांगा, विविध वन्यजीव, परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांची तपोभूमी अशा विविध वैशिष्ट्यामूळे गगनबावडा तालुका राज्य आणि देशाच्या नकाशात समाविष्ट करण्यात आला आहे. या तालुक्यात शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारी अनेक ठिकाणे आहेत. कोल्हापूर-गगनबावडा या मुख्य मार्गाला लागूनच असळज-पळसंबेचा माईसाहेब बावडेकरांचा राजवाडा हा त्यापैकीच एक होय. अलिकडेच संस्थेच्या वतीने डागडुजी केल्याने पर्यटकांना तो भुरळ घालतो आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव रामचंद्र पंत अमात्य यांची जहांगीरी म्हणजे गगनबावडा होय. काळाच्या ओघात येथील इमारती, भिंती, प्रवेशद्वार यांची पडझड झाली असली तरी त्यांचे महत्त्व कमी होत नाही. सभोवताली घनदाट जंगल, कुंभी नदी काठावरील हा राजवाडा म्हणजे एक पर्वणीच. वर्षभर पर्यटक आणि इतिहास प्रेमींची गर्दी होते. माईसाहेब बावडेकर संस्थेच्यावतीने या राजवाड्याचे नुकतेच नुतनीकरण केले आहे. राजवाड्यात काही नवीन खोल्यांचे बांधकाम केले आहे. पडझड झालेल्या भिंतींची डागडुजी, रंगरंगोटी, रंगीबेरंगी कौले, सभोवताली तटबंदी, विज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रंगला, सजलेला राजवाडा पर्यटकांना प्रमुख आकर्षण बनला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते गतवर्षी येथील काजवा रेस्टॅरंटचे उद्घाटन केले होते. येथे चहा, नाष्टा, जेवण व निवासाची उत्तम व्यवस्था केली आहे. आगदी माफक दरात सर्वच सुविधा उपलब्ध केल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. राजवाडा दर्शन, सभोवतालच्या जंगल परिसरात फेरफटका, पक्षी, प्राणी दर्शन मानवी मनाला उभारी देते. पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील सहकारी साखर कारखान्यासमोरच हे ठिकाण असल्याने येथे गर्दी वाढली आहे. कारखान्याकडे येणारा प्रत्येकजण राजवाड्याकडे वळतोच. येथील पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे.
चित्रीकरणासाठी पसंती
झपाटलेला या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण या राजवाड्यात झाले होते. अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. अलिकडे मराठी, हिंदी मालिकांचे चित्रीकरणही येथेच होते. येथील ऐतिहासिक, भौगोलिक परिस्थितीमूळे चित्रीकरणासाठी पसंती दिली आहे.