विशेष प्रतिनिधी/ पर्वरी
पर्वरी पोलीस वसाहतीतील काही जुन्या इमारतींच्या आजूबाजूला सर्वत्र झाडेझुडपे वाढलेली आहे. इमारतीचे छप्पर वाऱयाने उडाले आहे. भिंतीही पाण्याने फुगल्या असून त्या कोसळण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी या इमारतीमध्ये पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंब राहत होते. पण आता अनेक वर्षापासून त्या विनावापर असल्याने या इमाराती मोडकळीस आल्या आहेत.
पर्वरीत मोठी पोलीस वासाहत आहे. पोलीस व त्यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी या इमारती बांधल्या आहेत. यातील काही मोडकळीस आल्या आहेत. अजूनही अशा काही जुन्या इमारतींमध्ये पोलिसांचे कुटुंब राहते. त्यांची वेळेवर दुरुस्ती केली नसल्याने त्या खराब झाल्या आहेत.
पर्वरीतील खूप जूनी पोलीस वसाहत
पर्वरीत सध्या लोकवस्ती तसेच उपनगरे झाली आहेत. यातील पोलीस वसाहत व पुंडलिक नगर हे खूप जूने आहे. सरकारने कर्मचाऱयांसाठी राहण्यासाठी या ठिकाणी हाऊसिंग बोर्ड कॉलनी व पोलीस वसहतीची उभारणी केली. पण त्या नंतर या पोलीस वसाहतीची योग्यप्रमाणे देखभाल करण्यात आली नाही. अनेक पोलिसांची कुटुंबे या इमारतींमध्ये राहनू गेली, मात्र आता मोडकळीस आल्याने त्यामध्ये कोणच राहत नाही. त्यामुळे आजूबाजूला पूर्ण गवत व झाडेझुडपे वाढली आहेत. या इमारती कधीही जमीनदोस्त होऊ शकतात.
नवीन इमारती उभारण्याची गरज
पर्वरीतील मुख्य भागात ही वसाहत असल्याने या इमारती पाडून तिथे पुन्हा नवीन वसाहत उभारावी. जेणेकरून अन्य पोलिसांना तेथे राहता येणार आहे. सरकाराने याची दखल घेऊन स्थानिक आमदार तसेच पंचायतीला विश्वासात घेऊन या नवीन वसाहत उभारण्याची गरज व्यक्त होत आहे.