21 फूट अंतराचा प्रवास – मातीवर चाकाच्या खुणा उमटल्या
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
नासाकडून मंगळ ग्रहावर पाठविण्यात आलेला पर्सिव्हरेन्स रोव्हर शुक्रवारी पहिल्यांदाच स्वतःच्या लँडिंगच्या ठिकाणावरून पुढे सरकला आहे. सुमारे 21.3 फूट अंतरापर्यंत टेस्ट ड्राइव्ह करण्यात आली असून यामुळे मंगळाच्या मातीवर त्याच्या चाकाच्या खुणा उमटल्या आहेत.
या टेस्ट ड्राइव्हमध्ये पर्सिव्हरेन्सची यंत्रणा आणि उपकरणांची पडताळणी करण्यात आली आहे. पर्सिव्हरेन्सने जेथून स्वतःचे काम सुरू केले, अशा ठिकाणाला ‘ऑक्टिविया ई बटलर लँडिंग’ नाव देण्यात आले आहे.
हा रोव्हर नियमित स्वरुपात 656 फूट म्हणजेच 200 मीटरचे अंतर कापणार असल्याची अपेक्षा आहे. रोव्हरची 6 चाके उत्तमप्रकारे काम करत आहेत. पुढील 2 वर्षांपर्यंत आम्हाला विज्ञानाच्या जगात नेण्यास हे रोव्हर यशस्वी ठरणार असल्याचे उद्गार पर्सिव्हरेन्स रोव्हर मोबिलिटी टेस्टबेड इंजिनियर अनायस जारिफायन यांनी काढले आहेत.
33 मिनिटापर्यंत चालली प्रक्रिया
पर्सिव्हरेन्सच्या चाचणीची ही प्रक्रिया सुमारे 33 मिनिटांपर्यंत चालली आहे. रोव्हर पूर्वी 13 फूट चालला आणि नंतर 150 अंश कोनातून वळत तो सुमारे 8 फूट मागे सरकला आहे. रोव्हर सध्या स्वतःच्या टेम्परेरी पार्किंग स्पेसमध्ये आहे.
18 फेब्रुवारी रोजी मंगळावर लँड
पर्सिव्हरेन्स मार्स रोव्हर 18-19 फेब्रुवारीदरम्यान रात्री मंगळावरील जीवसृष्टी शोधण्यासाठी उतरले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री सुमारे 2 वाजता मंगळाचा सर्वात धोकादायक पृष्ठभाग जजिरो क्रेटरवर लँडिंग केले होते. या पृष्ठभागावर कधीकाळी पाणी असायचे. मंगळ ग्रहावरील चित्रण तसेच आवाज नोंदविण्यासाठी रोव्हरमध्ये 23 कॅमेरे आणि दोन मायक्रोफोन बसविण्यात आले आहे. रोव्हरसोबत दुसऱया ग्रहावर पोहोचलेला पहिला हेलिकॉप्टर इनजेन्युइटीमध्ये पॅराशूट आणि रेट्रोरॉकेट बसविण्यात आले आहेत.