वित्तीय, माहिती तंत्रज्ञान कंपन्या तेजीत :निफ्टी 11,000 वर
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने 399 अंकांची उसळी प्राप्त केली आहे. याच्यात प्रामुख्याने वित्तीय आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे समभाग खरेदीला गुंतवणूकदारांनी चांगली पसंती दर्शवली असल्याचे पहावयास मिळाले आहे. सेन्सेक्स पाठोपाठ निफ्टीने 11 हजारचा टप्पा पार केला आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर बंद होताना सेन्सेक्स 398.85 अंकांनी वधारुन निर्देशांक 37,418.99 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 120.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 11,022.20 वर स्थिरावल्याचे दिसून आले आहे. दिवसभरात मात्र बीएसई सेन्सेक्स 37,479 अंकांच्या उच्चांकावर राहिला होता.
प्रमुख कंपन्यांमध्ये सोमवारी बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते. दुसऱया बाजूला मात्र मारुती सुझुकी, सन फार्मा, एनटीपीसी आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
कोविडमुळे गुंतवणूकदार प्रभावीत
विविध प्रकारच्या अहवालामधून कोरोनाची जागतिक पातळीवर आणखीन एक लाट येण्याचे संकेत दिले जात आहेत. यामुळे गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याने गुंतवणूकदार संभ्रमात सापडले असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यामध्ये आशियाई बाजारात घसरणीचा कल नोंदवत बाजार बंद झाले आहेत. तर जगात कोविड बाधितांची संख्या 1.45 कोटी आणि मृत्यू होणाऱयांची संख्याही 6.06 लाखापेक्षा अधिक झाल्याची नोंद करण्यात आली आहे. हीच स्थिती देशात असल्याने भारतीय आरोग्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात 27,497 जण दगावले असून बाधितांची संख्या 11 लाखाच्या वर गेल्याने याच घडामोडींचा प्रत्यक्षपणे शेअर बाजारावर प्रभाव पडत गेल्याने गुंतवणूकदार काळजीत पडले आहेत.