हेब्बाळकर, राजू सेठ, हलगेकर शपथबद्ध : हंगामी सभाध्यक्ष आर. व्ही. देशपांडे
प्रतिनिधी/ बेंगळूर
16 व्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, 6 कॅबिनेट मंत्र्यांसह एकूण 182 आमदारांनी शपथ घेतली. 42 आमदार मंगळवारी आमदारपदाची शपथ घेतील. सकाळी अधिवेशनाला प्रारंभ होण्याआधी ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी हंगामी सभाध्यक्ष म्हणून राजभवन येथे शपथग्रहण केले. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली. बुधवारी अधिवेशच्या शेवटच्या दिवशी सभाध्यक्षांची निवड होणार आहे. या पदासाठी आर. व्ही. देशपांडे, टी. बी. जयचंद्र, एन. एच. कोनरे•ाr यांची नावे चर्चेत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, यमकनमर्डीचे आमदार व मंत्री सतीश जारकीहोळी, हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती, कागवाडचे आमदार राजू कागे, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, कुडचीचे आमदार महेंद्र तम्मण्णावर, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे, अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांच्यासह इतर आमदारांनी पदाची शपथ घेतली.
बिदर मतदारसंघाचे आमदार रहीम खान आणि हुक्केरी मतदारसंघाचे आमदार निखिल कत्ती यांनी इंग्रजीत शपथ घेतली. तसेच माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी ईश्वराच्या नावाने शपथ घेतली. चामुंडेश्वरी मतदारसंघाचे आमदार जी. टी. देवेगौडा यांनी चामुंडेश्वरी देवीच्या नावाने शपथ घेतली. विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी हिंदुत्त्व आणि गोमातेच्या नावे शपथ घेतली तर अपक्ष आमदार प्रदीप ईश्वर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शपथ घेतली.
कारवार जिल्ह्यातील मंकाळू वैद्य, शिवराम हेब्बार, सतीश सैल यांच्यासह इतरांनी आमदारपदाची शपथ घेतली. बागलकोटचे आमदार म्हणून एच. वाय. मेटी, मडिकेरीचे आमदार डॉ. मंथरगौडा, हानगल मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास माने, दासरहळ्ळीचे एस. मुनिराजू, आर. आर. नगरचे आमदार मुनिरत्न, बळ्ळारी ग्रामीणचे आमदार बी. नागेंद्र, मालूर मतदारसंघाचे आमदार नंजेगौडा, बळ्ळारी शहरचे आमदार नारा भरत रेड्डी यांनी, हनूरचे आमदार एम. आर. मंजुनाथ यांनीही आमदारपदाची शपथ घेतली.
पक्षभेद विसरुन एकमेकांची विचारपुस
निवडणुकीनंतर विधानसभेवर निवडून आलेले आमदार विधानसभा कामकाजात सहभागी होण्यासाठी सोमवारी विधानसौधमध्ये आले. सर्वांनी पक्षभेद विसरुन एकमेकांची भेट घेत विचारपुस केली. काहींनी हस्तांदोलन करून तर काहींनी एकमेकांना आलिंगन देऊन संवाद साधला. त्यामुळे विधानसौधमध्ये नूतन आमदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विधानसौध इमारतीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काहीजणांनी पायऱ्यांना माथा टेकविली. प्रथमच आमदार बनलेल्यांमध्ये कुतूहल अधिक होते. सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन केले. काहींनी निवडणुकीतील जय-पराजयावरही चर्चा केली. आमदारांचा फोटो सेशनही झाला. 16 व्या विधानसभेच्या आमदार परिचय पुस्तिकेत हे फोटो समाविष्ट केले जाणार आहेत.
चक्क उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने शपथ
दावणगेरे जिल्ह्यातील चेन्नगिरी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार बसवराज शिवगंगा यांनी चक्क उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नावाने शपथ घेतली. त्यामुळे विधानसभेतील आमदारांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. काहींनी यावरर आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहात काही वेळ गोंधळ निर्माण झाला. यावेळी हंगामी सभाध्यक्षांनी व्यक्तीच्या नावे शपथ ग्रहण करू देऊ नका, अशी सूचना विधानसभेच्या सचिव विशालाक्षी यांना दिली.