दुसऱया रेल्वेगेटवर वाहतूक कोंडी
प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वेगेटच्या दुसऱया टप्प्यातील कामाला मंगळवारपासून सुरुवात झाली. सकाळी 8 वाजल्यापासून रेल्वेगेट बंद करून रेल्वेगेटनजीकच्या कामाला सुरुवात करण्यात आली. दुसऱया टप्प्यात रेल पॅनेल बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मंगळवारी गेटबंद असल्याने दुसऱया रेल्वेगेटवर वाहतूक वाढली. यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला.
मिरज ते लोंढा या दरम्यान रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण केले जात आहे. टप्प्याटप्प्याने हे काम सुरू करण्यात येत असून बेळगाव ते खानापूर टप्प्यातील काम सद्या प्रगतिपथावर आहे. महिन्याभरापूर्वी पहिले रेल्वेगेट येथे ट्रक घालण्यात आला होता. तसेच जुना ट्रक बाजूला करून नवीन ट्रक घालण्याचे काम चार-पाच दिवस चालले होते. या दरम्यानही रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते.
आजही चालणार काम
तानाजी गल्ली रेल्वेगेटचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा पहिले रेल्वेगेटनजीकच्या दुसऱया टप्प्यातील कामाला मंगळवारपासून सुरुवात झाली. मंगळवार व बुधवार असे दोन दिवस हे काम चालणार आहे. रेल्वेगेट बंद असल्याने दुसरे रेल्वेगेट येथे वाहतूक कोंडी वाढली. तिसऱया रेल्वेगेटचेही काम सुरू असल्यामुळे दुसऱया रेल्वेगेटवरील वाहतूक वाढल्याचे दिवसभरात दिसून आले.