वाहतुकीला ठरत होते अडथळे, व्यापाऱयांमधून समाधान व्यक्त
प्रतिनिधी /बेळगाव
पांगुळ गल्ली येथे रस्त्यामध्येच असलेले लोखंडी खांब वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्यामुळे ते हटविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर मंगळवारी हेस्कॉमकडून या मागणीची दखल घेतली गेल्याने व्यापाऱयांमधून समाधान व्यक्त होत आहे. या परिसराला भूमिगत विद्युत वाहिन्यांमधून पुरवठा केला जाणार आहे.
बेळगाव शहरातील एक महत्त्वाची व्यापारी पेठ म्हणून पांगुळगल्लीची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी या गल्लीमध्ये मास्टरप्लॅन करून रस्ता मोठा करण्यात आला होता. रस्ता मोठा झाला तरी जुने लोखंडी विद्युत खांब रस्त्यामध्ये होते. मास्टरप्लॅन महानगरपालिकेने केल्यामुळे त्यानीच विद्युतखांब बदलावेत, अशी भूमिका हेस्कॉमने घेतली होती. तर नागरिकांना त्रास होत असल्यामुळे हेस्कॉमनेच ते खांब इतरत्र हलवावे, असे मनपाचे म्हणणे होते. या दोन्ही विभागांच्या दुर्लक्षामुळे विद्युतखांब रस्त्यामध्येच राहिले.
विद्युतखांब रस्त्यामध्ये असल्यामुळे वाहनचालकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच याचा फटका व्यापाऱयांनाही होत होता. त्यामुळे हे खांब त्वरित बदलावेत, अशी मागणी होत होती.
अखेर उशिरा का होईना पण हेस्कॉमला शहाणपण आले. मंगळवारी सकाळपासून 10 ते 12 जुने विद्युतखांब काढण्यात आले. धुलिवंदन दिवशी अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगण घालण्याचा मोठा कार्यक्रम होतो. तत्पूर्वी हे खांब हटविल्याने समाधान व्यक्त होत आहे.
भूमिगत विद्युत वाहिन्यांद्वारे कनेक्शन
पांगुळ गल्ली येथील रहिवाशांना भूमिगत विद्युत वाहिनीतून कनेक्शन देण्यात आले होते. परंतु पथदीपांसाठी जुन्याच विद्युत खांबावरून कनेक्शन होते. मंगळवारी जुने विद्युत खांब काढून पथदीप व घरगुती कनेक्शन भूमिगत विद्युत वाहिन्यांनी जोडण्यात आले.
–अरविंद गदगकर-(स. कार्यकारी अभियंता)