वृत्तसंस्था/ जम्मू
पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात सैन्याचा एक ज्युनियर कमिशन ऑफिसर हुतात्मा झाला आहे. राजौरी जिल्हय़ाच्या केरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. 3 दिवसांपूर्वीच नियंत्रण रेषेवर पाकच्या गोळीबारात सैन्याचा नायब सुभेदार हुतात्मा झाला होता.
अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानने चालू वर्षात 2700 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मागील वर्षी हा आकडा 3,168 तर 2018 मध्ये 1,629 इतका राहिला होता. या कालावधीत पाकच्या गोळीबारात 21 नागरिकांचा मृत्यू झाला असून 94 जण जखमी झाले आहेत.
सैन्य आणि बडगाम पोलिसांनी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला मदत पुरविणाऱया 4 आरोपींना अटक केली आहे. सैन्याच्या शोधमोहिमेदरम्यान या आरोपींनी दहशतवाद्यांना लपण्यास मदत केली होती. आरोपींकडून एके-47च्या 24 राउंड्स आणि 5 डेटोनेटर हस्तगत करण्यात आले आहेत.