मुसळधार बर्फवृष्टीमुळे हजारो वाहने अडकली : लष्कराकडूनही बचावकार्य
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील पंजाबच्या मुरीच्या डोंगराळ भागात झालेल्या जोरदार हिमवर्षावामुळे 1000 हून अधिक पर्यटक वाहने अडकली आहेत. या भागात सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी किमान 10 जणांचा वाहनांमध्येच गोठल्याने मृत्यू झाला आहे. कारमध्ये बसल्या जागेवर मृत्यूमुखी पडलेल्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यासोबतच कठीण परिस्थितीशी झुंजणाऱया पर्यटकांचे व्हिडीओ आणि फोटोही मोठय़ा प्रमाणात शेअर केले जात आहेत. आपत्कालीन बचाव सेवा 1122 ने दिलेल्या माहितीनुसार, एक पोलीस कर्मचारी, त्याची पत्नी आणि 6 मुलांचाही मृतांमध्ये समावेश आहे. आणखी एका कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. डोंगराळ भाग असल्याने पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर बचावकार्यात गुंतले आहे. मात्र त्यांनाही बचावकार्यात अडचणी येत आहेत.
हिमवर्षावामुळे काही वाहनांमधील लोकांची सुटका करण्यात आली असून अजूनही एक हजारहून अधिक वाहने अडकल्याची माहिती रावळपिंडीच्या उपायुक्तांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. मुरीच्या डीएसपींनीही व्हिडीओ संदेश जारी करत आतापर्यंत 4 फूट बर्फवृष्टी झाली असून शेकडो झाडे पडल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी याबाबत अधिक माहिती देताना संकटात सापडलेले सर्व पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते. शनिवारी परतीच्या मार्गावर असताना बरेचजण रस्त्यावरच अडकल्याचे सांगितले. तसेच या भागात पर्यटक वाहनांची मोठी रीघ लागल्यामुळे हे संकट ओढवल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी स्पष्ट केले.
मुरी हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या उत्तरेस समुद्रसपाटीपासून सुमारे 7,500 फूट उंचीवर वसलेले एक छोटेसे पर्यटनस्थळ आहे. 19 व्या शतकात ब्रिटीश सैन्याने वैद्यकीय तळ म्हणून ते विकसित केले होते.