ऑनलाईन टीम/तरुण भारत
चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून याच कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असणाऱ्या शीआन शहरामध्ये लॉकडाउन लावलाय. या लॉकडाउनची घोषणा करतानाच चीनने आपल्या अधिकाऱ्यांना शिक्षाही सुनावलीय. चीनमध्ये अचानक रुग्णसंख्येचा विस्फोट होण्यामागे अप्रत्यक्षपणे पाकिस्तान कनेक्शन असल्याची माहिती समोर आलीय.
दरम्यान, पाकिस्तानमधून आलेलं एक विमान चीनमधील कोरोनाच्या या नवीन प्रादुर्भावासाठी कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे. चीनच्या केंद्रीय अनुशासन निरीक्षण आयोगाने जारी केलेल्या एका वक्तव्यानुसार शीआनमधील २६ अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलंय. ‘चांगलं काम न केल्याप्रकरणी’ २६ जणांना दोषी ठरवण्यात आलंय.