ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
कराचीमध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी (दि.20) आरोपीने कराचीतील रणछोड लाईन भागातील हिंदू मंदिरात प्रवेश करत हिंदू देवता जोग माया यांच्या मूर्तीची हातोड्याने तोडफोड केली. यावेळी मंदिरात जमलेल्या लोकांनी आरोपीला मारहाण करत पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, या प्रकारामुळे भागात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपीवर ईशनिंदा संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. कराची येथील रणछोड लाईन येथे आणखी एका हिंदू मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. तर मंदिर प्रार्थनास्थळ होण्यास पात्र नाही, असे सांगून हल्लेखोरांनी तोडफोडीचे समर्थन केले. हे पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंविरुद्ध राज्य-समर्थित दहशतवादी कृत्य आहे, असं सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.