पाकिस्तानात कोरोनाबाधितांचे प्रमाण गुरुवारी वाढून 2,40,848 वर पोहोचले आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 3,359 नवे रुग्ण सापडले असून 61 जणांचा मृत्यू ओढवला आहे. कोरोनाबळींचे एकूण प्रमाण 4,983 झाले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. पंजाब तसेच खैबर पख्तूनख्वा प्रांतातही कोरोना संकट वाढत चालले आहे. देशातील आरोग्य व्यवस्था कोरोना संकटामुळे तोकडी पडू लागली आहे. चाचण्यांचे प्रमाण अल्प असल्याने कोरोना रुग्णांची प्रत्यक्ष संख्या प्रचंड असू शकते.
हाँगकाँगमध्ये पुन्हा संसर्ग
हाँगकाँगमध्ये गुरुवारी 42 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सलग दुसऱया दिवशी रुग्णसंख्या वाढल्याने कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याची भीती लोकांना सतावू लागली आहे. रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक टेबलाभोवती बसलेल्या लोकांची संख्या 8 पेक्षा कमी ठेवण्याचा निर्देश आहे. तर चारपेक्षा अधिक लोकांना एकत्रितपणे बारमध्ये बसता येणार नाही. हाँगकाँगमध्ये शुक्रवारपासून निर्बंध लागू होणार आहेत.