कारापूर सर्वण, वेळ्ळी या पंचायतींसाठी पोटनिवडणूक : 186224 मतदार ठरवणार 409 उमेदवारांचे भवितव्य
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील पाच पालिकांसाठी आज शुक्रवार दि. 23 एप्रिल रोजी होणाऱया निवडणुकीत एकूण 402 उमेदवारांचे भवितव्य सिलबंद होणार आहे. त्याशिवाय दोन ग्राम पंचायतींच्या दोन प्रभागांसाठी 7 उमेदवार नशीब आजमावत आहेत. सर्व ठिकाणी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून प्रत्येक निवडणूक बूथवर सर्व साहित्यासह अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत.
पाच पालिकांपैकी उत्तर गोव्यात म्हापसा ही एकमेव पालिका तर उर्वरित सर्व पालिका दक्षिण गोव्यातील आहेत. त्यात मडगाव, मुरगाव, केपे, सांगे यांचा समावेश आहे. दोन पंचायतींपैकी डिचोली तालुक्यातील कारापूर सर्वण (प्रभाग क्र. 2) ही उत्तर गोव्यात तर सालसेतमधील वेळ्ळी (प्रभाग क्र. 4) ही पंचायत दक्षिण गोव्यातील आहे. म्हापसा-20, मुरगाव -25, मडगाव-25, केपे-13, तर सांगेत-10 प्रभागात मतदान होणार आहे.
म्हापसा पालिकेसाठी 81 उमेदवार, मुरगांवसाठी 125, मडगाव 98, केपे 55 आणि सांगे पालिकेसाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत. कारापूर सर्वण आणि वेळ्ळी पंचायतीसाठी अनुक्रमे 5 आणि 2 उमेदवार तर 627 आणि 372 मतदार आहेत.
1,85,225 मतदार बजावणार हक्क
पाच पालिकांच्या निवडणुकीत सुमारे 1,85,225 मतदार हक्क बजावणार आहेत. त्यात 91519 पुरूष आणि 93706 महिलांचा समावेश आहे. त्यासाठी 231 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान मतपत्रिकांच्या माध्यमातून निवडणूक होणार आहे.
सोमवार दि. 26 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रारंभ होईल व दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यात येतील. दरम्यान, पाचही पालिका परिसरातील पात्र मतदारांना आज भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.