मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गतवर्षी कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे शहरातील व जिल्हय़ातील गणेशोत्सव मंडळांनी अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. मात्र, त्याचा फटका मूर्तिकारांना बसला आहे. कारण दरवर्षी प्रमाणेच मूर्तिकारांनी मोठय़ा मूर्ती केल्या होत्या. पण मूर्तीच्या उंचीबाबत निर्बंध घालण्यात आल्यामुळे त्या मूर्ती गणेशोत्सव मंडळांनी स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे त्या मूर्ती तशाच वर्षभर ठेवण्यात आल्या आहेत. आता कोरोना कमी झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नियमावलीचे काटेकोर पालन करून आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य केले. बेळगावात गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भक्त काम करतात. तेव्हा हा उत्सव साजरा करण्यास कोणतेही निर्बंध घालू नयेत आणि नाहक त्रास देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. बऱयाच वेळा ऐनवेळीच काही निर्बंध घातले जातात. त्यामुळे मूर्तिकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना अडचण निर्माण होते. तेव्हा जे नियम असतील ते आताच जाहीर करून आम्हाला सहकार्य करावे, असेही म्हटले आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोंटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक, माजी नगरसेवक राजू बिर्जे, खजिनदार मंगेश नागोजीचे, राजकुमार बोकडे, पी. जे. घाडी, हिरालाल चव्हाण, एस. के. खटावकर, तानाजी शिंदे, राजू अष्टेकर, रणजित हावळाण्णाचे, राजाराम सूर्यवंशी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.