वृत्तसंस्था/ मुंबई
पार्ले प्रॉडक्टस् आता पॅकेजड् पीठाच्या बाजारातही उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनी येणाऱया काळात गव्हाचे पीठ पॅकेजड् स्वरूपात लाँच करणार असल्याचे समजते. आयटीसीच्या आशीर्वाद आणि पतंजलीच्या पीठासोबत आता पार्लेची स्पर्धा रंगणार आहे.
आशीर्वादने बाजारात 50 टक्के इतका हिस्सा काबीज केला आहे. 90 वर्ष जुनी अशी पार्ले कंपनी प्रथमच गव्हाच्या पीठाच्या क्षेत्रात उतरत आहे. इतर उत्पादनासोबत पीठाच्या उत्पादनातही आता पार्ले आघाडी घेणार आहे. लोकांचा सध्या आरोग्यदायी उत्पादने घेण्यावर भर आहे, हे लक्षात घेऊनच पार्लेने वरील निर्णय घेतला आहे.
भारताची पीठाची बाजारपेठ ही वार्षिक 20 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीची आहे. यातील अर्धा वाटा हा ब्रँडेड कंपन्यांनी मिळवला आहे. यात आयटीसी, अदानी आणि पतंजली यांनी आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षभरात पीठासोबत इतरही महत्त्वाच्या वस्तुंच्या विक्रीत वाढ झाली आहे.