वार्ताहर/ निपाणी
नगरपालिका कार्यालय म्हणजे शहराच्या व्यवस्थापनाचे केंद्र अशीच कांहीशी ओळख, रस्ते खराब झाले, पाणी आले नाही, गटारी तुंबल्या, पथदीप लागले नाहीत अशा कारणांतून नगरपालिकेलाच जबाबदार धरले जाते. मूलभूत सेवा सुविधा, विकास यातून येथील अधिकारी असो वा कर्मचारी नेहमीच एका दडपणाखाली असतो. अशा पालिका अधिकारी व कर्मचाऱयांचे दडपण दूर करताना कार्यक्षमता वाढविण्याचा उद्देश डोळय़ासमोर ठेवून निपाणीत पालिकेकडून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होताना 97 पालिका कर्मचारी सध्या योग शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
देशाचा विकास होण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाचा विकास झाला पाहिजे. नागरिकाचा विकास होण्यासाठी त्याचे प्रथम अंतरमन शुद्ध व्हायला हवे. अंतरमन शुद्ध झाले तर कार्यक्षमता निश्चितपणे वाढते. कार्यक्षमता वाढल्यास समाधान होते. समाधानातून निश्चित विकासगंगा वाहू लागते. अशाच काहीशा विचारातून स्वविकासातून देश विकासाच्या योगदाची शिकवण देणारे हे शिबिर गुरुवर्य ऋषी प्रभाकर यांच्या प्रेरणेतून भरविण्यात आले आहे. याचे नेतृत्व योग शिक्षक विजय मेत्राणी व डॉ. राजू कुकडे हे करत आहेत.
नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून सुरू आहेत. विजय मेत्राणी व डॉ. राजू कुकडे यांनी शिबिराच्या नियोजनाचे महत्त्व विषद करताच आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी पुढाकारातून शिबिर सुरू केले. या शिबिरात अधिकारी व कर्मचारी असे 97 जण सहभागी होत आहेत. या आगळय़ा वेगळय़ा उपक्रमातून पालिका अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. हे शिबिर 15 दिवस चालणार आहे.
निरोगी व समृद्ध जीवनासाठी
स्वविकासातून देशविकास हे ब्रिद डोळय़ासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन केले जाते. नगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी आरोग्य संपन्न झाला. तर कार्यक्षमताही वाढते. हे लक्षात घेऊन योग शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात विजय मेत्राणी व डॉ. राजू कुकडे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभत आहे, अशी प्रतिक्रिया आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी दिले.
पंच कोबशुद्धीसह अष्टांग योग
प्रत्येकजण हा परिपूर्ण असतो पण आचार विचारातून तो दिशाहीन होतो. अशा व्यक्तींना जागृतीचा डोस शिबिरात दिला जातो. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय अशी पंच कोषशुद्धी होते. त्याचबरोबर यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याआहार, धारण, ध्यान, समाधी असे अष्टांग योगही या शिबिरात 15 दिवसादरम्यान शिकविले जातात, असे योगाचार्य विजय मेत्राणी यांनी सांगितले.