जीत आरोलकर यांचे आवाहन
वार्ताहर /पालये
ज्याप्रमाणे युरोपमध्ये लहान मुलांचे सुप्तगुण हेरून वेळीच त्यांच्या आवडीनुसार शिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे पालकांनी आपल्या पाल्याचे सुप्तगुण ओळखून आपल्या पाल्यांना उत्तुंग शिखरावर आरूढ होण्यास हातभार लावावा, असे आवाहन मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी केले.
मधलावाडा-पालये येथील देव काळे परब मांगर येथे आयोजित 68 व्या शारदोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, पालयेच्या सरपंच रंजना परब, माजी सरपंच गोपाळ परब, पालये पंचायतसदस्य सागर तिळवे, कोरगाव पंचायत सदस्य पालयेकर, शारदोत्सव समितीचे अध्यक्ष उल्हास परब, उपाध्यक्ष विठू परब, खजिनदार स्वप्नेश परब, उपखजिनदार सहदेव परब, सचिव महेंद्र परब, मुखत्यार शेखर परब, उपमुखत्यार वासुदेव परब यांची उपस्थिती होती.
सरकारी शाळांचा दर्जा वाढविण्याच्यादृष्टीने आपले प्रयत्न असतील, असेही आमदार आरोलकर म्हणाले. एकतेचे दर्शन आणि भारतीय संस्कृतीचे जतन मधलावाडा शारदोत्सव समितीकडून होत असल्याचे प्रतिपादन कलशावकर यांनी केले.
सरपंच या नात्याने आपले सहकार्य नेहमी असेल, असे सरपंच रंजना परब म्हणाल्या. पंचायतसदस्य सागर तिळवे यांनीही शारदोत्सव समितीला शुभेच्छा देऊन मधलावाडा तरूणाईच्या एकजुटीची प्रशंसा केली. उल्हास वसंत परब, कमलाकांत वसंत परब, मेघा स्वप्नेश परब, शिवा आत्माराम परब, संदेश तातो परब यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान, मधलावाडय़ावरील दिवंगत वासुदेव विश्वनाथ परब, देवानंद सहदेव परब, विलास फटू परब, जयराम राजे परब, उषाबाई उत्तम परब, सत्यभामा लक्ष्मण परब, दत्तप्रसाद कृष्णा पालयेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान, मधलावाडा येथील सुपुत्र वन अधिकारी नंदकुमार परब यांची आयएएस कॅडरमध्ये निवड झाल्याबद्दल शारदोत्सव समितीतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांचे वडील एकनाथ परब यांनी हा सन्मान स्वीकारला. सूत्रसंचालन प्रकाश परब यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रसाद परब यांनी केले.