काणकोण पालिकेला विश्वासात न घेतल्याने नगराध्यक्षांकडून संताप
प्रतिनिधी /काणकोण
पर्यटनखाते आणि पर्यटन महामंडळाने पाळोळे किनाऱयावर उभारलेल्या प्रसाधनगृहाचा 17 रोजी सकाळी 11.30 वा. उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष तसेच मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे व काणकोणचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, पाळोळेचे प्रसाधनगृह ही मालमत्ता काणकोण नगरपालिकेच्या मालकीची असताना काणकोण पालिका मंडळाला विश्वासात न घेता या प्रसाधनगृहाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला असल्याबद्दल नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काणकोण पालिकेच्या पाळोळे वॉर्डांतील नगरसेवकांना लोकांनी निवडून दिलेले आहे. आपण स्वतः आणि लक्ष्मण पागी हे दोन्ही नगरसेवक या वॉर्डांतील आहेत. असे असताना सत्ताधारी गटाशी चर्चा न करता या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे. त्याला आपला तसेच सत्ताधारी गटातील अन्य नगरसेवकांचा विरोध आहे. या प्रकाराचा आपण निषेध करतो, असे नगराध्यक्ष रिबेलो यांनी आपल्या कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.