चीजवस्तूंसह पैसे, दागिनेही आगीच्या भक्ष्यस्थानी : दोन लाखांहून अधिक नुकसान
वार्ताहर / कुडाळ:
पावशी-मिटक्याचीवाडी येथील हेमंत लक्ष्मण पंडित यांच्या राहत्या घराला मंगळवारी दुपारी आग लागली. यात घराच्या छपरासह आतील कपाटे, कपडे, इलेक्ट्रिक वस्तू व अन्य साहित्य तसेच पैसे व दागिनेही जळून खाक झाले. यात अंदाजे दोन लाख रु. हून अधिक नुकसान झाले. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. घरातील माणसे नातेवाईकांकडे गेली होती. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पंडित मिटक्याचीवाडी येथील घरात राहतात. त्यांच्या कुटुंबामध्ये पाच सदस्य आहेत. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंडित कुटुंब आपले घर बंद करून नेरुर येथील नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या घराला आग लागल्याने ग्रामस्थांनी पाहिले. आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट मोठय़ा प्रमाणात पसरत होते. या घटनेची कल्पना ग्रामस्थांनी पंडित कुटुंबाला दिली. नंतर ग्रामस्थांनी तेथे धाव घेत पाण्याचा मारा करून ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
आगीचे रौद्ररुप, अग्निशमन दलाला पाचारण
आगीने रौद्ररुप धारण केले होते. आत जाणेही धोक्याचे बनले होते. परंतु घराच्या काही भागातील सामान ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले. स्वयंपाक खोली व देवघराचा भाग वगळता घराच्या अन्य भागाचे नुकसान झाले. घराच्या छपरापर्यंत आगीने पेट घेतला. अखेर कुडाळ-एमआयडीसी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्याद्वारे पाण्याचा मारा करण्यात आला. परंतु त्यांच्या घराच्या निम्म्याहून अधिक भाग आगीत बेचिराख झाला होता.
ग्रामस्थांची धाव व मदतकार्य
पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, ग्रामसेविका सरिता धामापूरकर, तलाठी श्री. हार्दळकर व ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. ग्रामस्थांनी घरातील काही सामान बाहेर काढले.
पाच-सहा वर्षांपूर्वी बांधले होते नवीन घर
दुपारी साडेबारा वाजता हेमंत पंडित पत्नी व मुलांसह नेरुर येथील नातेवाईकांकडे गेले होते. तेथे पोहोचताच दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारे जयेश घोगळे यांनी त्यांना या घटनेची कल्पना दिली. त्यांनी तात्काळ पावशी येथे धाव घेतली. त्यांची आई दोन दिवसांपूर्वी अन्य नातेवाईकांकडे गेली आहे. पंडित यांचे त्याठिकाणी जुने घर होते. तेथेच त्यांनी पाच-सहा वर्षांपूर्वी नवीन घर बांधले. नवीन घर जळून मोठे नुकसान झाले. आतील गृहोपयोगी व जीवनावश्यक वस्तू आगीत भस्मसात झाल्याने पंडित कुटुंबाला मानसिक धक्का बसला. या घटनेची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा करण्यात आली.