वार्ताहर / दाभाळ
अवकाळी पावसामुळे बेतोडा निरंकाल पंचायत क्षेत्रातील मुख्य तथा अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेली माती, चिखल, दगडधोंडे पालापाचोळय़ामुळे रस्ता निसरडा झाला असून वाहनचालकांना वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरू लागला आहे. पंचायतीने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर साचलेली माती हटविण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱया पावसामुळे बाजूच्या डोंगरावरील माती रस्त्यावर वाहून आली आहे. बऱयाचठिकाणी ही माती साचल्याने वाहनांसाठी ती धोकादायक ठरत आहे. सतत कोसणारा पाऊस व चिखलामुळे रस्ते निसरडे बनले आहेत. निरंकाल भागातील रस्त्यांवर धोकादायक वळणे व उतरणी लागत असल्याने दुचाकीचालक या मातीवरून घसरून पडण्याचा वाढता धोका आहे.
मोन्सूनपूर्व कामे हाती घेण्यापूर्वीच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने गटारे व खळय़ांमध्ये अडथळे तयार होऊन पाणी रस्त्यावरुन वाहू लागल्याने सोबत माती व कचरा ठिकठिकाणी साचलेला आहे. मोन्सूनचा पाऊस सुरु होण्यापूर्वी साफसफाईचे काम हाती घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.