प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विभागातील नागरिकांच्या सोयीसाठी शहरात पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात आले. बेळगावात केंद्र असूनही नागरिकांना हुबळी-धारवाड केंद्राची फेरी चुकली नाही. याठिकाणी विविध कागदपत्रासाठी जाचक अटी लादण्यात येत असल्याने नागरिक हुबळी-धारवाड केंद्रात धाव घेत आहेत. यामुळे जाचक अटी का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना हुबळीला धाव घ्यावी लागत होती. यामुळे बेळगावमध्ये पासपोर्ट केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पासपोर्ट केंद्र बेळगावमधील मुख्य पोस्ट कार्यालयात सुरू झाले. यामुळे नागरिकांची हुबळी फेरी वाचली अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. पण पासपोर्टकरिता विविध जाचक अटी आणि कागदपत्राची पुर्तता करण्याची सुचना करण्यात येत असल्याने नागरिकांना कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. गुणपत्रिका आणि आधार ओळखपत्रात काही त्रुटी असल्यास आधार ओळखपत्र अपडेट करून देण्याची सुचना करण्यात येत आहे. पासपोर्ट करिता आवश्यक कागदपत्राची पुर्तता करूनदेखील चुकीची दुरूस्ती करण्याची सक्ती करण्यात येत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. आधारओळख पत्र, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना आदी कागदपत्रातील नाव व्यवस्थित असतानादेखील गुण पत्रिकेतील नावाप्रमाणे कागदपत्रे देण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे सर्व कागदपत्रे दुरूस्ती करण्यासाठी नागरिकांना संबधित कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे. पण असा प्रकारच्या अटी हुबळी केंद्रात लादल्या जात नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगाव केंद्रात विविध कागदपत्रासाठी प्रलंबित असलेल्या नागरिकांनी हुबळी केंद्रात धाव घेवून अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राव्दारे पासपोर्ट मिळविला आहे. यामुळे आवश्यक कागदपत्रे सादर करूनही नागरिकांचे हेलपाटे का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे पासपोर्ट मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी होत आहे.