ऑनलाईन टीम / पिंपरी :
नागपूर येथून पुण्यात आणलेल्या दोन्ही मेट्रो टेन रुळावर चढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही टेनच्या साहाय्याने संत तुकाराम नगर ते फुगेवाडी यादरम्यान पुणे मेट्रोची पहिली ट्रायल घेण्यात येणार आहे.
महामेट्रो (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन)चे तीन डबे (कोच) रविवारी (दि. 29) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. त्यानंतर, आणखी तीन कोच शहरात आले. सुरुवातीला पहिल्या तीन कोचची एक मेट्रो टेन रुळावर चढवून तिचे उदघाटन करण्यात आले. तर त्यानंतर दोन दिवसांनी आणखी एक मेट्रो टेन रुळावर चढविण्यात आली आहे.
पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील काम प्रगतीपथावर आहे. जून 2017 मध्ये महा मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणे, रूळ अंथरणे, विद्युत तारा, सिग्नल आणि अन्य तांत्रिक कामे वेगाने झाली. तीस महिन्यांच्या कालावधीत बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर, मेट्रोसाठी नागपूर येथून कोच आणण्यात आले आहेत. मेट्रोचे दोन संच नागपूरहुन पुण्यात आणले आहेत. पुण्यात कोच डेपोचे काम अद्याप झाले नाही. त्यामुळे कोचमध्ये विविध उपकरणांची चाचणी करण्यासाठी पुणे मेट्रोला नागपूरवर अवलंबून राहावे लागत आहे.
सुरुवातीला आणलेले दोन संच नागपूर येथील कोच डेपोमध्ये प्राथमिक चाचण्या, फिटिंगची कामे आणि रंगसंगती व सजावट करून पुण्याकडे रवाना करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये आणखी दोन मेट्रो टेन आणल्या जाणार आहेत. त्या वनाज ते रामवाडी या मार्गावरील चाचणीसाठी वापरल्या जाणार आहेत. एकूण चार मेट्रो टेनच्या साहाय्याने पुणे मेट्रोची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावर मेट्रो धावण्यास सुरु होईल.