पिंप्रद येथील घटना, वादावादीत मुलावर घातला कुऱहाडी घाव
प्रतिनिधी/ फलटण
पिंप्रद (ता. फलटण) येथे सिकंदर काळ्या उर्फ डिसमुख भोसले व मुलगा सुरज सिकंदर भोसले या बापलेकामध्ये झालेल्या वादावादीत बापाने मुलगा सुरज भोसले यास कुऱहाडीचा घाव घालून खून केला असल्याची घटना घडली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती व फिर्यादी दामिणी सुरज भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार दि. 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वा. सुमारास सासरे सिकंदर काळ्या उर्फ डिसमुख भोसले पिंप्रद ता. फलटण यांनी पहिली बायको असताना दुसरी बायको येडाबाई हिच्याबरोबर गाठ बांधल्याने यावरून मुलगा सुरज भोसले व वडिलांच्यामध्ये वादावादी झाली. या वादावादीचे रूपांतर भांडणात झाल्यावर सिकंदर भोसले यांनी सुरज भोसले यांच्या डोक्यात व डाव्या पायावर कुऱहाडीने घाव घालून गंभीर दुखापत करुन खून केला आहे, अशी तक्रार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून सिकंदर काळ्या उर्फ डिसमुख भोसले याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 164/2021 नुसार भा.द.वि. स. 302, 352, 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनास्थळी अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी देशमुख व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.