वार्ताहर / किणये
पिरनवाडी येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांतर्फे शनिवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गावातील काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. शनिवारी सकाळी या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणची साफसफाई करून तेथे विविध प्रकारच्या रोपटय़ांची लागवड केली.
गावातील स्मशानभूमिची साफसफाई करून या स्मशानभूमीत सुमारे 50 झाडे लावली. लावण्यात आलेली झाडे जगविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही या कार्यकर्त्यांनी सांगितले.
सकल मराठा समाजाच्या या कार्यकर्त्यांकडून गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून विविध उपक्रम राबविले जात आहेत. बेळगावात सध्या कोरोनामुळे मृत्यू पावणाऱयांची संख्या अधिक आहे. मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांना जेवण देऊ लागले आहेत.
राम मंदिर येथे सकाळी 8 वाजल्यापासून हे कार्यकर्ते जेवण तयार करतात व घरोघरी जाऊन त्याचे वितरण करतात. याशिवाय गावात सॅनिटायझरची फवारणीही या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या या विविध उपक्रमांचे गावात कौतुक होत आहे.