अल अमेरात (ओमान) / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक पात्रता फेरीतील आजच्या (गुरुवार दि. 21) लढतीत बांगलादेशचा संघ तुलनेने दुबळय़ा पापुआ न्यू गिनिया संघाविरुद्ध विजयासाठी प्रबळ दावेदार असेल. येथे विजय संपादन करत सुपर-12 फेरीसाठी पात्रता मिळवण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत दुपारी 3.30 वाजता होणार आहे.
बांगलादेशचा संघ या पात्रता फेरीत सहावा मानांकित या नात्याने मैदानात उतरला. मात्र, पहिल्याच लढतीत स्कॉटलंडविरुद्ध धक्कादायक पराभव पत्करावा लागल्याने ते आगेकूच करु शकणार का, याबद्दल साशंकता निर्माण झाली. मात्र, दुसऱया लढतीत ओमानचा 26 धावांनी फडशा पाडत ते विजयाच्या ट्रकवर आले. सध्या ते गटात तिसऱया स्थानी आहेत. पीएनजीविरुद्ध विजय संपादन केल्यास येथे त्यांना 2 गुण मिळतील. मात्र, त्यांना त्यानंतर ओमानने स्कॉटलंडविरुद्ध पराभव पत्करण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ओमानने सुपर-12 फेरीत आपले स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे.
बांगलादेश संघाकरिता स्टार अष्टपैलू शकीब हसनचे योगदान पुन्हा एकदा महत्त्वाचे ठरणार आहे. शकीबने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर उत्तम सातत्य राखले असून फिरकीला पोषक खेळपट्टीवर तो पीएनजीच्या फलंदाजांविरुद्ध अर्थातच भेदक मारा करु शकतो. गोलंदाजीच्या आघाडीवर मुस्तफिजूर रहमानने ओमानविरुद्ध 4 बळी घेत आपला फॉर्म अधोरेखित केला. आता तीच घोडदौड येथेही कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल. ऑफब्रेक गोलंदाज मेहदी हसन देखील भेदक मारा करण्याच्या दृष्टीने निर्धाराने मैदानात उतरेल, अशी बांगलादेश थिंक टँकला अपेक्षा आहे.
तस्किन अहमद व मोहम्मद सैफुद्दिन पुन्हा एकदा नियंत्रित टप्प्यावर मारा करण्यासाठी प्रयत्नशील असतील. या संघाचा कर्णधार महमुदुल्लाहने ओमानविरुद्ध सामना जिंकला असला तरी अद्याप कामगिरीत बरीच सुधारणा करावी लागणार असल्याचे म्हटले आहे.
पीएनजीचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात
पात्रता फेरीतील पहिले दोन्ही सामने गमावले असल्याने पीएनजी संघाचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असून आजची लढत त्यांच्यासाठी औपचारिक स्वरुपाची आहे. त्यांना पात्रता फेरीतील पहिल्या लढतीत ओमानविरुद्ध 10 गडय़ांनी व दुसऱया लढतीत स्कॉटलंडविरुद्ध 17 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पीएनजीचा कर्णधार असदने सलामी लढतीत शानदार अर्धशतक झळकावले होते. तो फॉर्म कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
संभाव्य संघ
बांगलादेश ः महमुदुल्लाह (कर्णधार), लिटॉन दास, मोहम्मद नईम, मेहदी हसन, शकीब हसन, सौम्या सरकार, मुश्फिकूर रहीम, नुरुल हसन (यष्टीरक्षक), अफिफ होसेन, नसूम अहमद, तस्किन अहमद, शमिम होसेन, मुस्तफिजूर रहमान, मोहम्मद सैफुद्दिन.
पीएनजी ः असद वाला (कर्णधार), चार्ल्स अमिनी, लेगा सियाका, नॉर्मन व्हॅनुआ, नोसेना पोकाना, किपलिंग डोरिगा, टोनी उरा, हिरी हिरी, टोका, सेसे बाऊ, डॅमिएन, व्हागी-मोरिया, सिमॉन अताई, जेसॉन किला, सोपर, जॅक गार्डनर.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.