जपानच्या यमागुचीचा विजयी धडाका कायम
वृत्तसंस्था/ बाली (इंडोनेशिया)
सलग दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेती तसेच विद्यमान विश्वविजेती महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे इंडोनेशिया मास्टर्स-750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले. जपानच्या यमागुचीने सिंधूचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात जपानच्या यमागुचीने केवळ 32 मिनिटांच्या कालावधीत पीव्ही सिंधूचा 21-13, 21-9 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूरवरील स्पर्धेत पीव्ही सिंधूने उपांत्य फेरी गाठण्याची ही सलग दुसरी वेळ होती. गेल्या महिन्यात तिने प्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यात ती यशस्वी झाली नाही.
येथे इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूने तुर्कीच्या येगिटचा 21-13, 21-10 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले होते. पुरुष विभागात भारताच्या किदाम्बी श्रीकांतने आपल्याच देशाच्या एचएस प्रणॉयचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.