ऑल इंग्लंड बॅडमिंटन चषक- थायलंडच्या चोचूवांगविरुद्ध पराभवाची नामुष्की, अवघ्या 43 मिनिटात चोचूवांगची आगेकूच
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूला प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा उपांत्य फेरीतच आव्हान संपुष्टात येण्याची नामुष्की पत्करावी लागली. तिला थायलंडच्या पोर्नपवी चोचूवांगकडून अवघ्या 43 मिनिटात 17-21, 9-21 अशा सरळ फरकाने पराभवाचा धक्का सोसावा लागला.
जागतिक क्रमवारीतील सातवी मानांकित सिंधू यापूर्वी 2018 च्या आवृत्तीमध्येही उपांत्य फेरीतच गारद झाली होती. वास्तविक, या उपांत्य लढतीपूर्वी सिंधूने चोचूवांगविरुद्ध झालेल्या 5 लढतीत 4-1 असे वर्चस्व गाजवले होते. पण, येथे चोचूवांगने विजयश्रीवर कब्जा केला.
यमागुचीविरुद्ध विजयश्री निष्फळ
तत्पूर्वी, सिंधूने जपानच्या तिसऱया मानांकित अकाने यमागुचीविरुद्ध रोमांचक विजय प्राप्त करत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. शुक्रवारी उत्तररात्री येथे रंगलेल्या त्या लढतीत सिंधूने 16-21, 21-16, 21-19 अशी पिछाडी भरुन काढत विजयावर शिक्कामोर्तब केले. ही लढत 1 तास 16 मिनिटे चालली होती. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची तिची ही केवळ दुसरी वेळ होती.
पीव्ही सिंधूने आजवर यमागुचीविरुद्ध झालेल्या लढतीत 10-7 अशी कामगिरी नोंदवली असली तरी मागील 3 लढती सलग गमावले असल्याने तिच्यावर दडपण होते. त्यातच पहिला गेम 16-21 असा गमवावा लागल्याने तिच्यासमोर आणखी प्रतिकूल स्थिती होती. मात्र, नंतर सलग दोन गेम अनुक्रमे 21-16, 21-19 अशा फरकाने जिंकत तिने आगेकूच केली.
‘2019 नंतर मी यमागुचीविरुद्ध एकही लढत लढलेली नव्हते. पण, या कालावधीत आपल्या खेळावर तिने बरेच कष्ट घेतले असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले. आजची लढत माझ्यासाठी आव्हानात्मक होती. पहिल्या गेममध्ये माझ्याकडून अनेक चुका झाल्या. पण, नंतरच्या दोन सेटमध्ये मी माझ्या खेळात सुधारणा केली. त्यामुळे, विजयश्री खेचून आणता आली’, असे सिंधू उपांत्य फेरीतील लढतीत विजय मिळवल्यानंतर म्हणाली होती.
यापूर्वी, स्विस ओपनच्या फायनलपर्यंत धडक मारणाऱया सिंधूने येथे पहिल्या गेममधील काही अपवाद वगळता आक्रमक खेळावर भर दिला. पहिला गेम 21-16 जिंकत यमागुचीने सिंधूला बिकट स्थितीत आणले. मात्र, पुढील दोन गेममध्ये तिला आपल्या खेळात सातत्य राखता आले नाही. याऊलट, सिंधूने यमागुचीला चुका करणे भाग पाडत मजल-दरमजल प्रवासासह आगेकूच कायम राखली. मात्र, नंतर उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्याने पीव्ही सिंधूची निराशा झाली.