पुणे / प्रतिनिधी
पूर्वमध्य अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीला समांतर कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली असून, याच्या प्रभावामुळे महाराष्ट्र, गोव्यात पुढील तीन दिवस वादळी पाऊस, तर कर्नाटकात 20 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तरपश्चिमेच्या दिशेने सरकणार असून, येत्या 48 तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. यामुळे कोकण- गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसांसाठी वर्तविण्यात आला आहे. याशिवाय दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र असून, ते पश्चिमेकडे आंध्र तसेच तामिळनाडू किनारपट्टीकडे सरकणार आहे. याच्या प्रभावामुळे बुधवारी आंध्र व तामिळनाडू किनारपट्टीला आँरेंज अलर्ट, तर गुरुवारी आंध्र किनारपट्टीला रेड अलर्ट आहे. या दोन्ही क्षेत्रांच्या प्रभावामुळे कर्नाटकातही पावसाची शक्यता आहे.