ऑनलाईन टीम / पुणे :
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पुणे परिमंडलात प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला. अनेक ठिकाणी यंत्रणा जमीनदोस्त झाली. मात्र महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत दुरुस्ती कामे करीत 12 तासांमध्ये काल रात्रीपर्यंत तब्बल 1 लाख 27 ग्राहकांचा तर आज दुपारी 12 वाजेपर्यंत आणखी 6350 ग्राहकांचा अशा एकूण 1 लाख 33 हजार 350 ग्राहकांचा वीजपुरवठा 24 तासांच्या आत पूर्ववत करण्याची कामगिरी केली. मंगळवारी (दि. 18) सायंकाळपर्यंत अतिदुर्गम व डोंगराळ भागातील सुमारे 2700 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरु होती.
या चक्रीवादळामुळे पुणे परिमंडलामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वादळ व मुसळधार पाऊस झाला. वीजयंत्रणेवर झाडे व मोठ्या फांद्या पडल्याने काही मोजक्याच भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. अवघ्या दीड तासांच्या कालावधीमध्ये तेथील वीजपुरवठा दुरुस्ती कामे व पर्यायी व्यवस्थेमधून सुरु करण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये चक्रीवादळाच्या प्रभावातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची कामगिरी अभियंते व कर्मचाऱ्यांनी चोखपणे बजावली.
ग्रामीण भागामध्ये डोंगराळ भागातील वीजयंत्रणेला मात्र या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. पुणे परिमंडल अंतर्गत लोणावळा, खंडाळा, पानशेत, कामशेत, वेल्हा, मुळशी, जुन्नर, आंबेगाव आदी परिसरातील डोंगराळ व दुर्गम भागातील वीजयंत्रणा वादळामुळे कोलमडली. यामुळे 245 गावांमधील 1 लाख 36 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र सोमवारी (दि. 17) रात्री उशिरापर्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुरुस्ती कामे करीत तब्बल 1 लाख 27 हजार आणि मंगळवारी (दि. 18) दुपारी 12 वाजेपर्यंत 6350 अशा एकूण 1 लाख 33 हजार 350 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. यामध्ये ग्रामीण भागात चक्रीवादळामुळे अंधारलेल्या 245 पैकी 215 गावे, वाड्या व वस्त्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. सद्यस्थितीत लोणावळा, आंदरमावळ, पानशेत, माले, खानापूर व आंबेगाव परिसरातील डोंगराळ व अतिदुर्गम भागातील 30 गावे, वाड्या, वस्त्या व पाड्यांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत.
सद्यस्थितीत ग्रामीण भागातील सर्व मुख्य वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. मात्र दुर्गम व डोंगराळ भागात लघुदाबाच्या वाहिन्या व रोहित्रांच्या स्ट्रक्चरवर झाडे व फांद्या पडलेल्या आहेत. त्या हटवून लघुदाब यंत्रणेची दुरुस्ती वेगाने सुरू आहे व उर्वरित 2700 ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येत आहे.