ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. पुण्यात मागील काही दिवसांपासून 3 हजारपेक्षा अधिक रुग्ण वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निर्बंध अधिक कडक करण्याचा इशारा दिला आहे.
मोहोळ म्हणाले, की पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये दररोज 3000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिक आणि प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ‘जम्बो रुग्णालय’ पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महापौर पुढे म्हणाले, यासोबतच ऑक्सिजन बेडची संख्याही वाढवण्यात येणार आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी सुदैवाने 23 हजार सक्रीय रुग्णांपैकी 85 टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ही बाब दिलासादायक आहे.
दरम्यान, काल पुणे शहरात 2,900 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 20 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील एकूण आकडा 2 लाख 35 हजार 394 वर पोहोचली आहे. कालच्या दिवशी 1,245 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,07,817 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 22,542 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 5,053 जणांचा मृत्यू झाला आहे.