ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठ यांना अटक करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठे ज्वेलर्सच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून प्रणव मराठे यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. एकूण 18 गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. न्यायालयाने प्रणव मराठेंना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी काटे यांनी प्रणव मराठेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मराठे ज्वेलर्समध्ये जानेवारी 2017 ते 2021 या कालावधीत फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींने गुंतवणुकदारांची रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे दिसून येत असल्याचे, पोलिसांचे म्हणणे आहे. त्या आधारावर प्रणव मराठे यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपीला गुह्यांच्या तपासासाठी हजर राहण्याबाबत वारंवार नोटिशीद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, आरोपीने सहकार्य केले नाही, संबंधित कंपनी, वैयक्तिक; तसेच संयुक्त बँक खात्यांचा आवश्यक तपशील सादर केलेला नाही. ठेवीदारांकडून प्राप्त ठेवी व्याजासह परत न करता त्याचा विनियोग कोणत्या मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी केल्या आहेत, याबाबत तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एम. बी. वाडेकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली असून न्यायालयाने 18 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.