ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही बंद असलेल्या पुणे शहरातील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग आता 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. अशी माहिती पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली.
दरम्यान, याआधी 24 डिसेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. महापालिकेकडून यासंबंधी अधिकृत पत्रक काढण्यात आले होते.
इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीचे वर्ग दिनांक 1 फेब्रुवारीपासून सुरू होत असेल तरी, यावेळी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. यामधे शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेत स्वच्छ्ता आणि निर्जंतुकीकरण विषयक सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.
यासोबतच थर्मामीटर, थर्मल गन, जंतुनाशक, साबण, पाणी आदी आवश्यक बाबींची शाळा प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे. याशिवाय वर्गात तसेच स्टाफरुममधील बैठकव्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार ठेवावी लागणार आहे. वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावासहित बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण विभागाला सादर करणे बंधनकारक आहे.
तसेच वर्ग बंद खोल्यांमध्ये भरवता येणार नाही. हवा बाहेर जाण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या असतील याची काळजी शाळेने घ्यायची आहे.