नागरिकांसह व्यापाऱयांची गैरसोय,जनरेटरचा खर्च वाढल्याने नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे हैराण असणाऱया व्यापाऱयांना आता अचानक वीजपुरवठा ठप्प होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारी सकाळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे नागरिकांसह लहान व्यापाऱयांची गैरसोय झाली. निदान कामाच्या वेळी तरी वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी व्यापाऱयांमधून होत आहे.
कोरोनामुळे व्यवसायांवर अनेक बंधने आली आहेत. व्यापारही जेमतेम होत आहे. नाईट कर्फ्यूनंतर आता विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. यामुळे व्यवसाय कसा करायचा? असा प्रश्न व्यापाऱयांसमोर असताना त्यातच भरीस भर म्हणजे अनियमित वीजपुरवठा. वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर उद्योगव्यवसाय ठप्प होतात. शुक्रवारी सकाळी हेस्कॉमकडून कोणतीही पूर्वसूचना नसताना वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अचानक वीजपुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांसह व्यापाऱयांची गैरसोय झाली. अनेकांनी याबाबत हेस्कॉमच्या कार्यालयात फोन करून विचारणा केली. मात्र लवकरच वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे उत्तर त्यांना देण्यात आले.
जनरेटरचा खर्च वाढला
हेस्कॉमचा अनागोंदी कारभार सुरू असल्यामुळे केव्हाही वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे व्यापारी तसेच उद्योजकांनी इन्व्हर्टर, जनरेटरची व्यवस्था केली आहे. विजबिल भरूनदेखील जनरेटर व इन्व्हर्टरचा खर्च व्यापाऱयांना करावा लागत आहे. व्यापार कमी असताना हा अधिक खर्च उचलावा लागत असल्याने व्यापाऱयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मुख्य वीजवाहिनीमध्ये काहीकाळ बिघाड
शुक्रवारी सकाळी मुख्य वीजवाहिनीमध्ये काहीकाळ बिघाड झाला होता. यासाठी काही भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ज्या भागात वीजपुरवठा ठप्प होता. त्या त्या भागाला पर्यायी मार्गाने वीजपुरवठा करण्यात आल्याची माहिती हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद गदगकर यांनी दिली.