जेरुसलेम / वृत्तसंस्था
पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील संशयित कंपनी एसएसओची चौकशी करण्याचा आदेश इस्रायल सरकारने दिला आहे. या कंपनीच्या कार्यालयांवर धाडी घालण्यात आल्या आहेत. महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचा दावा होत आहे. कंपनीने मात्र ही आपल्या व्यवहारांमध्ये काही बेकायदेशीर असल्याचा आरोप नाकारला आहे. कायद्याच्या चौकटीतच कारवाई झाली असे कंपनीचे म्हणणे आहे.
इस्रालयाच्या निर्यात नियंत्रक विभागाने या कंपनीच्या कार्यालयांमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱयांना बरेच प्रश्न विचारले आहेत. आतापर्यंत झालेल्या चौकशीवर कोणतीही प्रतिक्रिया अधिकाऱयांनी दिलेली नाही. सध्या केवळ माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीतून काही महत्वाचे हाती लागल्यास त्यावरुन पुढचे निष्कर्ष काढण्यात येतील, असे सांगण्यात आले.
कंपनीचे प्रतिपादन
एनएसओ समूहाचे प्रतिनिधित्व मर्क्युरी पब्लिक अफेअर्स ही कंपनी करत आहे. तिच्या म्हणण्यानुसार पेगॅसस प्रकरणात काहीही हाती लागणार नाही. कंपनीचे व्यवहार अतिशय पारदर्शी पद्धतीने करण्यात आले आहेत. हे हेरगिरी सॉफ्टवेअर केवळ समाजकंटकांविरोधात उपयोगात आणले जाते. या सॉफ्टवेअरचा उपयोग करुन आजवर अनेक दहशतवादी गट, आर्थिक गुन्हेगारी करणारे गट, आणि इतर गुन्हय़ांचा शोध लागला आहे. मात्र, कोणाच्याही खासगीत्वाच्या अधिकाराचा भंग करण्यासाठी ते उपयोगात आणले जात नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.
इस्रायलचे मंत्री गॅन्टझ् यांनी या सॉफ्टवेअरची निर्यात केवळ सरकारी संस्थांना केली जाते असा दावा केला. इस्रायलचे सरकार कोणत्याही बेकायदेशीर उपयोगासाठी हे सॉफ्टवेअर निर्यात करीत नाही. त्यासंबंधी देशाचे नियम अतिशय कठोर आहेत आणि त्यांचे क्रियान्वयन काटेकोरपणे केले गेले आहे. मात्र अन्य कोणा बाहय़ शक्तीकडून या सॉफ्टवेअरचा दुरुपयोग केला गेला आहे का, याची कसून चौकशी केली जाईल असा खुलासा त्यांनी केला.