मुंबईत पेट्रोल 103 रुपये प्रतिलिटरसमीप ः डिझेलची वाटचाल ‘शंभरी’कडे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात बुधवारी पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलची किंमत 102 रुपये प्रतिलिटरपेक्षाही जास्त झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे 25 पैशांनी तर डिझेलचे दर 13 पैशांनी वाढवले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलेचे दर 96.41 रुपये प्रतिलिटरवरून 96.66 वर पोहचले आहेत. तर दिल्लीत डिझेलचे दर 87.28 रुपये प्रतिलिटरवरून 87.41 वर पोहचलेत. मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 102.82 रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी 94.84 रुपये मोजावे लागत आहेत. वेगवेगळय़ा राज्यांकडून आकारण्यात येणारे कर हे वेगवेगळे असल्याने देशभरामध्ये राज्यनिहाय दर बदलतात.
महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचे दर 105.15 रुपये आणि डिझेलचे दर 95.63 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. येथे एका लिटर पेट्रोलसाठी 107.79 रुपये मोजावे लागत आहेत. तर येथे डिझेल 100.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. मध्यप्रदेशमधील अनुपनगरमध्ये पेट्रोल 107.43 रुपयांना तर डिझेल 98.43 रुपये प्रतिलिटर झाले आहे. देशामध्ये एकीकडे कोरोनाचे संकट आहे तर दुसरीकडे महागाईचा फटका नागरिकांना बसताना दिसत आहे.
इंडियन ऑईल कॉर्परेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्या रोज इंधनाचे दर बदलत असतात. जागतिक स्तरावर तेलाचे दर वाढल्याने इंधन दरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. रोज सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात.