नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लॉकडाऊनच्या काळात तब्बल 80 दिवसांनंतर तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. अडीच महिन्यांनंतर पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 60 पैसे प्रतिलिटरची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत आता पेट्रोल 78.91 रुपये आणि डिझेल 69.79 रुपयेवर पोहोचले आहे. तर नवी दिल्लीत पेट्रोल 71.86 रुपये आणि डिझेल 69.99 रुपये करण्यात आले आहे. तर हैदराबादमध्ये पेट्रोलचा 74.61 रुपये आणि डिझेलचा 68.42 रुपये भाव आहे. 16 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरचा बदल करण्यात आला होता. मात्र, काही राज्य सरकारांनी आपले उत्पादन वाढविण्यासाठी राज्याच्या उत्पादन शुल्कात वाढ केली होती.
लॉकडाऊनच्या कालावधीत पेट्रोलिअम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दरात कोणताही बदल केला नव्हता. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी दरात आता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमध्ये सुधारणा करण्याबाबतही चर्चा झाली होती. देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नव्हता. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील व्हॅटमध्ये महाराष्ट्र, दिल्ली सरकारसह देशातील अनेक राज्यांनी वाढ केली होती.