मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार
प्रतिनिधी /पणजी
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केल्याने गोमंतकीय जनतेला फार मोठा दिलासा मिळाला. त्याचबरोबर राज्यातील जनतेला पर्रीकरांच्या काळातील निर्णयाचीही खास आठवण झाली.
केंद्र सरकारवर सध्या वाढत्या पेट्रोल दराने सर्वसामान्य नागरिक आणि जवळपास सर्वच राजकीय पक्ष जोरदार टीका करीत असल्याने केंद्राने पेट्रोल व डिझेलवरील आयात करात पेट्रोल रु. 5 व डिझेल रु. 10 नी कमी केल्याने देशभरातील जनतेला दिवाळीच्या या पूर्वसंध्येने आनंदी ठेवले. गोव्यातील जनतेला यामुळे पेट्रोल प्रति लिटर रु. 12 नी तर डिझेल प्रति लिटर रु. 17 नी कमी झालेले आढळून आले. नागरिक यामुळे खुष झालेले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्र सरकारच्या या घोषणेचे जोरदार स्वागत करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोमंतकीय जनतेच्यावतीने आभार मानले.
जनतेला पर्रीकरांच्या निर्णयाची झाली आठवण
तथापि, राज्यातील जनतेला पेट्रोलचे दर खाली आणले व प्रति लिटर रु. 12 नी खाली आल्याने मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असतानाचे दिवस आठवले. मनोहर पर्रीकर यांनी 2011 मध्ये जनतेला सत्तेवर आणा पेट्रोलचे भाव प्रतिलिटर 12 रु. ने कमी करू असे आश्वासन दिले होते. 2012 च्या निवडणुकीत जनतेने भाजपला गोव्यात विजयी केले. भाजप सत्तेवर येताच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी सुरू केली. सुमारे रु. 62 प्रतिलिटर असा पेट्रोलचा दर होता तो रु. 50 पर्यंत खाली आणला होता. त्यावेळी प्रतिलिटर रु. 12 कमी झाले होते. त्यावेळची याद गोव्यातील अनेक नागरिकांनी मोदी सरकारच्या निर्णयामुळे काढली.
हा निर्णय पुरेसा नाही : कामत
अनेक राज्यांतील निवडणुकांत पराभव झाल्यानंतर व काँग्रेस पक्षाने केलेल्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे असंवेदनशील भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर प्रत्येकी 5 व 10 रुपयांनी कमी केला. हा निर्णय पुरेसा नाही. पंतप्रधान स्वयंपाक गॅसच्या किमती कमी करणार का ? गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करुन गोमंतकीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत पूर्वीच्याच दराने उपलब्ध करा : ढवळीकर
भाजप सरकारने कोविड-19 मुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले होते. आता स्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेल पूर्वीच्याच दराने म्हणजे 50 ते 60 रुपये दराने उपलब्ध करावे, केवळ निवडणुका जवळ येत असल्याने दर कमी करण्याचे चित्र निर्माण करू नये असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी म्हटले आहे.
सर्वसामान्य जनतेला महागाईचा जबरदस्त फटका बसू लागला आहे. जनतेला दिलासा देण्याचे काम सरकारकडून व्हायला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.