13 दिवसांत अकराव्यांदा वाढ : मुंबईत सर्वाधिक 84-85 पैशांनी वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईत सर्वाधिक 84-85 पैशांची उसळी आली आहे. तेलाच्या किमतीत 13 दिवसांत झालेली ही अकरावी वाढ आहे. 22 मार्चपासून एक-दोन दिवस वगळता ‘नॉनस्टॉप’ इंधन दरवाढ होत असून आतापर्यंत प्रतिलिटर आठ रुपयांहून अधिक दरवाढ झाल्याने वाहनधारकांसह सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे.
दररोज वाढणाऱया पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे वाहनधारकांच्या खिशाला चाप बसत आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव 100 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आल्यानंतरही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. 4 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने करकपात करत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये कपात केली होती. मात्र, पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दोन आठवडय़ांपूर्वीपासून पुन्हा दरवाढीचा चटका सहन करावा लागत आहे.
रविवारी इंधनदर प्रतिलिटर 80 ते 85 पैशांनी वाढले आहेत. आतापर्यंत 13 दिवसांत 11 वेळा इंधन दरवाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीत इंधन दर 80 पैशांनी वाढले असून, पेट्रोल 103.41 रुपये प्रतिलिटर, तर डिझेल 94.67 रुपये प्रतिलिटर झाले आहे. याचबरोबर मुंबईत 84 पैशांची वाढ झाली असून त्यानुसार पेट्रोल 118.41 रुपये आणि डिझेल 102.64 रुपये प्रतिलिटर झाले आहे. चेन्नईमध्ये इंधन दरात 75 पैशांची वाढ होऊन, पेट्रोल 108.96 रुपये आणि डिझेल 99.04 रुपये लिटर आहे. कोलाकातामध्ये पेट्रोल दरात 84 पैशांची वाढ झाली असून पेट्रोल 113.03 रुपये लिटर पेट्रोल मिलथ आहे आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले असून डिझेल 97.82 रुपये प्रतिलिटर झाले आहे.