सलग सहाव्या दिवशी दरवाढ – वाहनधारकांच्या खिशावर ताण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी देशात पेट्रोल 35 पैशांनी आणि डिझेल 35 पैशांनी महागले आहे. मुंबईमध्येही पेट्रोलच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. नव्या दरवाढीनंतर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलची किंमत 115.50 रुपये आणि डिझेलची किंमत 106.62 रुपये प्रतिलिटरवर पोहोचली आहे. सरकारने वेळीच इंधन दरवाढ नियंत्रणासाठी पावले उचलली नाहीत, तर लवकरच पेट्रोलचे दर 120 पार पोहोचण्याच्या उंबरठय़ावर असल्याचे संकेत मिळत आहेत. सातत्याने होणाऱया इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत चालला आहे.
गेल्या महिन्याभरापासून काही किरकोळ दिवस वगळता दररोज इंधनाच्या दरात 30 ते 38 पैसे प्रतिलिटरने वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशीही प्रतिलिटर 35 पैशांनी वाढ झाली. देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत आता 109.69 रुपये आणि डिझेलची किंमत 98.42 रुपये प्रतिलिटर इतकी झाली आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल आता 110.35 आणि डिझेल 101.56 रुपये प्रतिलिटर झाले आहे. याव्यतिरिक्त चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर 106.35 रुपये आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लिटर आहे.
दरम्यान, कच्च्या तेलाचे उत्पादन करणारी संघटना या आठवडय़ात संयुक्त बैठक घेणार आहे. या बैठकीत उत्पादन वाढवण्यावर निर्णय होऊ शकतो. साहजिकच उत्पादन वाढल्यास दरवाढीवर नियंत्रण येऊ शकते.