प्रशासनाला सुबुद्धी देण्यासाठी भगवती देवीला साकडे : प्रथमेश म्हावळींगकर याच्यावर कारवाईची मागणी
प्रतिनिधी / पेडणे
सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रसारित करून मॉडेल प्रथमेश म्हावळींगकर याने पेडणेवासियांच्या भावना दुखावल्या. या प्रकरणी पेडणे तालुक्यातील प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. या विरोधात शुक्रवारी पेडणे येथे धरणे आंदोलनासाठी उपजिल्हाधिकाऱयांकडे नागरिकांनी परवानगी मागितली, मात्र त्यांनी ती नाकारली. याबाबत नागरिकांनी पेडणेचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि पोलीस निरीक्षकांना सुबुद्धी देण्यासाठी श्री भगवती देवीला घालून साकडे घातले.
पेडणे पोलीस स्थानकात मॉडेल प्रथमेश म्हावळींगकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली. ही तक्रार पेडणे पोलिसांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाई करण्यासाठी पाठविली. त्यानुसार पेडणे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांनी प्रथमेश म्हावळींगकर याला नोटीस बजावून शुक्रवारी 26 रोजी मार्च रोजी उपस्थित राहाण्याबाबत बजावले होते. मात्र प्रथमेश म्हावळींगकर शुक्रवारी पेडणे, न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर स्वतः हजर न राहता आपल्या वकिलामार्फत आपली बाजू मांडली.
याबाबत पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर यांच्याशी संपर्क साधला असता, प्रथमेश म्हावळींगकर विरोधात पेडणे पोलिसांनी आपल्याकडे पाठविलेल्या तक्रारीनुसार प्रथमेश म्हावळींगकर याला नोटीस पाठवली व 26 रोजी उपस्थित राहून पेडणेकरांच्या भावना दुखावल्याबद्दल कायदेशीर 10 हजार रुपयांचा जामीन देण्याबाबत कळविले होते. त्याच्या वकिलांनी ते मान्य केले. मात्र प्रथमेश म्हावळींगकर हा स्वतः हजर राहिला नाही. मात्र तो नंतर हजर होऊन जामिनाबाबत प्रक्रिया पूर्ण करणार, अशी माहिती उपजिल्हाधिकारी निपाणीकर यांनी दिली.
… तर कायदेशीर भूमिका घेऊ : ऍड गावकर
घटनेनुसार न्याय हक्कसाठी धरणे आंदोलन करणे संविधानिक हक्क आहे. तो कोणीही डावलू शकत नाही. यापुढे आवश्यता वाटल्यास त्याबाबत कायदेशीर भूमिका घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया ऍड. जितेंद्र गावकर यांनी दिली.
लोकप्रतिनिधींकडून दबावाचे राजकारण : उमेश तळवणेकर
लोकशाहीत प्रत्येकाला न्यायासाठी आवाज उठविण्याचा अधिकार आहे. मात्र पेडणे तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे सरकारी अधिकाऱयांवर दबाब आणत आहेत. त्याला पेडणेचे अधिकारी बळी पडत आहेत. यासाठी संबंधित सर्व अधिकाऱयांना श्री भगवती देवीने सुबुद्धी द्यावी, असे साकडे घातल्याची माहिती उमेश तळवणेकर यांनी दिली. पेडणे तालुक्यातील दोन्हीही लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत. या प्रकरणाबाबत ते फमूग गिळून गप्प आहेत, असा आरोप तळवणेकर यांनी केला.