मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : आमदार प्रवीण आर्लेकर यांचा वाढदिवस थाटात साजरा
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे मतदारसंघाचा पुढील पाच वर्षात चेहरा मोहरा बदलणार असून विविध प्रकल्पातून रोजगार, व्यवसायाच्या संधी पेडणेकरांना उपलब्ध होणार आहेत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पावर अजूनही मोठय़ा प्रमाणात नोकऱया मिळणार आहेत. प्रवीण पार्लेकर जी जी कामे घेऊन येतात त्या कामांना चालना देण्यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न आहे. भविष्यातही त्यांची कामे आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा गोवा हस्तकला व लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, पर्यटनमंत्री रोहन खवंटे, मंत्री सुभाष शिरोडकर, सभापती रमेश तवडकर, डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेटय़े, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, मुरगाव आमदार सकंल्प आमोणकर, मांदे आमदार जीत आरोलकर, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, वास्कोचे आमदार दाजी साळकर, आमदार उल्हास तुयेकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव, आदी उपस्थित होते.
प्रवीण आर्लेकर यांच्याकडे काम करण्याची धडाडी आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाला सुयश चिंतितो असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी सांगितले.
आयुष प्रकल्पातही पेडणेकरांना रोजगार मिळणार!
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, धारगळ येथे होणाऱया आयुष इस्पितळ तसेच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पावर स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आमदारांचा नेहमीच अट्टाहास असतो. आयुष इस्पितळ प्रकल्पावरही पेडणेकरांना मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, यासाठी प्रयत्न करून मतदारसंघाचा विकास करणार आहोत.
पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी, प्रवीण आर्लेकरांना शुभेच्छा देताना प्रवीण आर्लेकर हे स्वभावाने चांगले व काम करण्याची धमक असल्याचे सांगितले.
प्रवीण आर्लेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जमलेला जनसमुदाय बघून पेडण्याच्या जनतेचा प्रेम प्रवीण आर्लेकरांवर किती आहे हे दिसून येते. ही प्रवीण आर्लेकरांनी केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे सांगून सभापती रमेश तवडकर यांनी कौतुक केले.
यावेळी समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी प्रवीण आर्लेकर यांच्या कार्याची ध्वनी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. यानिमित्ताने कृष्णा पालयेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य, विविध पंचायतीच्या सरपंच, पंच, पेडणे नगरपालिका मंडळ, गोव्यातील विविध भागातून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती. स्वागत व प्रास्ताविक तुळशीदास गवस यांनी केले.