- संशयिताला बाये सुर्ला येथून अटक
- फोंडा पोलिसांनी 24 तासात लावला छडा
- पुरावा नष्ट करण्यासाठी दुसरा खून केल्याची कबुली
- संशयिताला चार दिवसांची पोलीस कोठडी
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा शहरात दिवसाढवळय़ा दोघा बहिणींचा निर्घृणपणे खून करून पसार झालेल्या प्रुरकर्म्याला फोंडा पोलिसांनी 24 तासाच्या आत रविवारी सकाळी अटक करीत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. संशयिताला बाये-सुर्ला येथून अटक करीत फोंडा तालुक्यातील पहिल्यादाच घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावला. महादेव दुर्गा घाडी (34, बाये – सुर्ला, डिचोली) असे संशयिताचे नाव आहे.
निवृत्त नर्स मयत जीवन व्यंकटेश कामत हिने संशयित महादेव याला दोन लाख रूपये (ऋण) उसने दिले होते. ते व्याजासह सुमारे 2 लाख 65 हजार रूपये इतके झाले होते. तिने ते परत देण्यासाठी तगादा लावण्यामुळेच दोघा सख्ख्या बहिणींचा खूनाचा प्रकार घडल्याचे पोलीस तपासांती निष्पन्न झाल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक पंकजकुमार सिंग यानी पत्रकार परिषदेत दिली.
सुपरमार्केट-फोंडा येथील कामत रेसिडेन्सीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटात दोघा वृद्ध बहिणींचा धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याचा खळबजनक प्रकार शनिवार 16 रोजी दुपारी उघडकीस आला होता. मंगला तुळशीदास कामत (75) व जीवन क्यंकटेश कामत (65) या बहिणींचा संशयिताने किचनमध्ये खून 11 वा.च्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
….उसने घेतलेले पैसे परतवू न शकल्याने घडले दुहेरी हत्यांकाड
खूनप्रकरणी गजाआड करण्यात आलेल्या संशयित महादेव हा मृत बहिणींच्या परिचयाचा होता. मागील 13 वर्षांपासूत ते एकमेकांना ओळखत होते. संशयित वेर्णा येथील पेंटायर या कंपनीत ऑपरेटर म्हणून कामाला आहे. तसेच कंपनीच्या कामगारांसाठी फोंडा येथील कामत रेसिडेन्सीच्या तिसऱया मजल्यावर फ्लॅटमध्ये तो अधूमधून यायचा, तेथूनच तो कामत बहिणींच्या परिचयाचा झाला होता. मयत जीवन कामत यांनी त्याला दोन लाख रु. उसने दिले होते. ते पैसे व्याजासह परत देण्याचा तगादा त्यांनी महादेव याच्याकडे लावला होता. तेव्हापासून तो दीड – दोन महिने फ्लॅटवर आलाच नव्हता. वारंवार फोनवर कारणे सांगून झाल्यावर तो जीवन कामत यांना आपली बाजू समजून सांगण्यासाठी दुचाकी पल्सर जीए 08 पी 5546 ने सुमपरमार्केट येथील कामत यांच्या फ्लॅटवर शनिवारी दाखल झाला होता. जीवन कामत व संशयितामध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर सदर खूनाचा प्रकार घडला. आपले कृत्य सर्वांसमोर येणार या भीतीमुळेच जीवन यांच्या मोठय़ा बहिणीचाही त्याने खून केला. त्यानंतर तो बाये-सुर्ला येथे परतला.
संशयित महादेवाची पार्श्वभूमी ठकसेनाची
संशयित महादेव हा ठकसेन म्हणून सर्वत्र परिचित असल्याची माहिती पोलिसांना तपासांती मिळाली आहे. वेर्णा येथील कामावरही त्याने अनेकजणांकडे उसने पैसे घेतलेले आहे. त्याला जुगाराचा नाद लागला होता. आपल्या तेरा वर्षाच्या ओळखीचा फायदा उठवत त्याने जीवन कामत यांच्याकडून सुमारे दोन लाख रूपये उसने घेतले होते. व्याजासह ती किंमत अडीच लाखाहून जास्त झाली होती.
संशयित महादेव यांचे वडील मूळ कर्नाटक येथील आहेत. वीस वर्षांपुर्वी वेळगे येथे खाण कंपनीत कामाला असताना कॉलनीतील वास्तव्यानंतर त्यांनी सुर्ला येथे घर विकत घेतले होते. त्यानंतर संशयितासह त्याची आई, दोन बहिणी व एक भाऊ मिळून त्याच राहत आहेत. मात्र मागील कित्येक वर्षापासून त्याचे वडील त्याच्यासोबत राहत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जीवनमुळेच कोरोनातून बचावली होती
दरम्यान, कोविड काळात जीवन कामत हिची मोठी बहीण मंगला हिची प्रकृती चिंताजनक बनली होती. जीवन नर्स असल्यानेच मधुमेह व कोविडच्या आजाराच्या काळात मोठय़ा बहिणीची उत्तम काळजी जीवनने घेतली व त्यामुळेच मंगला मृत्यूच्या दाढेतून परत आल्या होत्या मात्र तिच्या नशीबी भलतेच लिहिले होते, दोघांवरही काळाने एकाचवेळी झडप घातली. बालपणापासूनची साथ मृत्यूपर्यंत ठरली.
फोंडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
फोंडा पोलिसांनी या घटनेचा छडा लावताना सीसीटिव्ही फुटेज व मयताच्या फोनवरील संदेश व कॉल रेकॉर्ड महत्वाचे ठरले. त्यानुसार पोलिसांना संशयिताला पकडण्यात यश आले. या मोहिमेत दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग, उपअधीक्षक उदय परब, फोंडय़ाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी, सुरज काणकोणकर, संजीत पिल्ले, विभीनव शिरोडकर, नितेश काणकोणकर, महिला उपनिरीक्षक रश्मी भाईडकर, सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र गावडे, हवालदार केदारनाथ जल्मी, वंदेश सतरकर, अमेय गोसावी, महेश गावडे व टिमने छडा लावण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.
बांबोळी येथील गोमेकॉत शवचिकित्सा अहवालानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. अतिरक्तस्त्रावामुळे दोघां बहिणींचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयिताविरोधात भा.द.सं. 302 कलमाखाली गुन्हा नोंदवून चार दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.