कुंडई येथील ऋणनिर्देश सोहळा
वार्ताहर /मडकई
पोगो विधेयकाची मागणी करणाऱया रिव्होल्युशनरी गोवन्सच्या सदस्यांना शालेय जीवनातील भारत माझा देश आहे, आणि सर्व भारतीय आपले बांधव आहेत, या प्रतिज्ञेचा विसर पडलेला दिसतो. त्यांचे हे विधयेक निरर्थक आहे. विविध समस्यांनी ग्रासलेल्या समजाला मदत करण्याचे सोडून हे लोक ‘उजो उजो’ करीत आग लावत फिरत आहेत. त्यांचा हा आतताईपणा थांबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
दासोळवाडा-कुंडई येथील गडाम्या देवचार पेडाजवळ आयोजित केलेल्या करण्यात ऋणनिर्देश सोहळय़ात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायतसदस्य दामोदर नाईक, गणपत नाईक, कुंडईचे सरपंच विश्वास फडते, मगो युवा नेते मिथील ढवळीकर, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, दुर्भाट आडपईच्या सरपंच सरोज नाईक, केंद्रीय समितीचे खजिनदार अनंत नाईक, ज्येष्ठ नागरिक मोहन कुंडईकर, उपसरपंच सर्वेश जल्मी, शिल्पा कुवळेकर, संचिता परवार, रामू नाईक आदी उपस्थित होते.
दामोदर नाईक म्हणाले, सुदिन ढवळीकर यांची राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वी त्यांचे समाजकार्य सुरू होते. सन 1997 साली त्यांनी मांगिरीश युथसाठी आर्थिक सहाय्य दिले होते. त्यांच्या व मगो पक्षाच्या छायेत आपली राजकीय कारकीर्द टप्प्याटप्याने बहरत गेली.
विश्वास फडते यांनी सुदिन ढवळीकर यांची व आपली ओळख क्रिकेट खेळातून झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेली दानी वृत्ती आजही तशीच कायम आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी चौफेर विकास केला आहे.
सध्या कृषी क्षेत्रात वाव असून युवकांनी नोकरीच्या प्रतिक्षेत आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा या व्यावसायात भवितव्य घडवावे. मंत्री ढवळीकर यांनी पडिक शेती लागवडीखाली आणण्यासाठी कुंडईतील शेतकऱयांना नेहमीच प्रोत्साहन दिले, असे राजेश कवळेकर म्हणाले.
कवी दुर्गाकुमार नावती यांचा सन्मान
कुंडई गावचे सुपुत्र गायक, साहित्यिक व निवृत्त पोलीस अधिकारी दुर्गाकुमार श्रीकृष्णा नावती यांची लातूर महाराष्ट्र येथे होण्याऱया अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रीत कवी म्हणून प्रतिनिधी मिळाल्याने मगो पक्ष व माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक मिथील ढवळीकर यांनी केले. सूत्रसंचालन दुर्गाकुमार नावती यांनी तर रामू नाईक यांनी आभार व्यक्त केले.