पैंगीण पंचायतीच्या शिष्टमंडळाचे क्रीडामंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / काणकोण
मागच्या जवळजवळ 30 वर्षांपासून ज्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे त्या पैंगीण पंचायतीमधील पोटके मैदानाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला असून हा प्रकल्प क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याकडे सोपविण्याचा निर्णय पैंगीण पंचायतीने घेतला आहेश. पैंगीणच्या ग्रामसभेने तसा ठराव संमत केला आहे. त्यापूर्वी पैंगीण पंचायतीचे सरपंच जगदीश गावकर, पंच प्रवीर भंडारी, रूदेश नमशीकर यांच्या शिष्टमंडळाने क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांची उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्यासमवेत भेट घेऊन या मैदानाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आणि एक निवेदन सादर केले.
त्यापूर्वी पैंगीणचे सरपंच जगदीश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत उपसरपंच एल्डा फर्नांडिस, पंच सरिता पागी, प्रवीर भंडारी, रूद्रेश नमशीकर, स्थानिक समितीचे अजित पैंगीणकर, सुभाष महाले, व्यंकटराय नाईक, पंचायत सचिव राजीव ना. गावकर यांनी सदर प्रकल्प क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याकडे सुपूर्द करताना त्याचा अधिकार पंचायतीकडे देण्यात यावा, जेणेकरून स्थानिक खेळाडूंना त्याचा जास्तीत जास्त लाभ घेणे शक्य होईल, अशा सूचना केल्या.
तत्कालीन सरपंच जगदीश आचार्य यांच्या कारकिर्दीत पैंगीण कोमुनिदादीच्या मालकीची सदर जमीन क्रीडा मैदानासाठी आरक्षित करण्यात आली होती. त्यानंतर माजी क्रीडामंत्री आचार्य, मिकी पाशेको, रमेश तवडकर यांनी विविध कारणे दाखवून या मैदानाची पायाभरणी केली, मात्र प्रकल्प पुढे गेला नाही. तवडकर यांच्या कार्यकाळात या ठिकाणी मातीचा भराव टाकून आदिवासी क्रीडा महोत्सव, इफ्फीचे कार्यक्रम करण्यात आले. या मैदानाचा वापर सध्या पैंगीण पंचायत क्षेत्रातील शाळा शालेय व क्रीडा महोत्सवांसाठी, तर काही जण चालण्यासाठी करतात. साधारणपणे 17 हजार चौ. मी. इतकी जमीन पंचायतीच्या ताब्यात सध्या आली असून जोपर्यंत ही जमीन क्रीडा खात्याच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे अशक्य असल्याची माहिती क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याचे उपसंचालक महेश नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. सध्याच्या जमिनीतील 3 हजार चौ. मी. इतकी जमीन पंचायतीच्या बहुउद्देशीय प्रकल्पासाठी राखून ठेवण्यात येणार असल्याचे सरपंच गावकर यांनी स्पष्ट केले. उपसभापती फर्नांडिस यांना देखील सदर प्रकल्प लवकरात लवकर सुरू झालेला हवा असून त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न चालविले आहेत.