जोकोविच, सित्सिपसही यांचीही उपांत्य फेरीत धडक
वृत्तसंस्था/ पॅरिस
सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच आणि ग्रीसचा स्टीफानोस सित्सिपस यांनी पेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. महिला एकेरीत पोलंडच्या बिगरमानांकित स्वायटेकने अंतिम फेरीत स्थान मिळविताना पोडोरोस्काचा पराभव केला.
जागतिक अग्रमानांकित जोकोविचने स्पेनच्या 17 व्या मानांकित पाब्लो कॅरेनो बुस्टावर 4-6, 6-2, 6-3, 6-4 अशी मात करीत त्याचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यावेळी त्याच्या मानेला व खांद्याला वेदना झाल्याने त्याला उपचार करून घ्यावे लागले. मात्र बुस्टाने त्यावर टीका केली असून जोकोविच दुखापतीचे सोंग करीत असल्याचा आरोप केला. ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची जोकोविचची ही 38 वी वेळ आहे. त्याने याआधी एकदा ‘टोटल ग्रँडस्लॅम’ पटकावले असून हा पराक्रम दुसऱयांदा करण्यासाठी त्याला आणखी दोनच विजयाची गरज आहे.
‘कोर्टवर येण्याआधीच मला त्रास सुरू झाला होता. वार्मअपच्या वेळी मानेत आणि खांद्यात वेदना होत होत्या. पण त्याकडे मी आता जास्त लक्ष देणार नाही. मला आता बरे वाटत असून मी ठीक आहे,’ असे जोकोविचने सांगितले. टोटल ग्रँडस्लॅम दोनदा साधणारा तो गेल्या 50 वर्षातील पहिला टेनिसपटू होण्याच्या मार्गावर आहे. या वर्षीच्या 37 सामन्यात त्याला फक्त एकदाच पराभव स्वीकारावा लागला आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेत बुस्टाविरुद्धच्या सामन्यावेळीच त्याला अपात्र ठरविल्याने त्याची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
ग्रीसच्या पाचव्या मानांकित सित्सिपसने रशियाच्या 13 व्या मानांकित आंद्रेय रुबलेव्हचा 7-5, 6-2, 6-3 असा पराभव करून दुसऱयांदा ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या फेरीत सित्सिपसने मुनारविरुद्ध दोन सेट्स गमविले होते. त्यानंतर आतापर्यंत त्याने सलग 15 सेट्स जिंकले आहेत. जोकोविचविरुद्ध त्याची उपांत्य लढत होईल.
स्वायटेक अंतिम फेरीत
महिला एकेरीत पोलंडच्या 19 वर्षीय इगा स्वायटेकने या स्पर्धेची पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठताना अर्जेन्टिनाच्या पात्रता फेरीतून आलेल्या नादिया पोडोरोस्काचा 6-2, 6-1 असा फडशा पाडला. गेल्या 81 वर्षात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी स्वायटेक ही पोलंडची पहिली महिला आहे. विशेष म्हणजे अंतिम फेरी गाठेपर्यंत तिने एकही सेट गमविलेला नाही. पेत्रा क्विटोव्हा आणि सोफिया केनिन यापैकी एकीशी शनिवारी तिची जेतेपदाची लढत होईल. ‘या कामगिरीने मी स्वतःच चकित झाले आहे. माझ्याकडून इतका चांगला खेळ होईल, असे मला सुरुवातीला वाटले नव्हते. पण एखाद्या ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली तर ती पेंच ग्रँडस्लॅमच असेल, असे मात्र निश्चितपणे वाटत होते,’ असे स्वायटेक सामन्यानंतर म्हणाली.
यापूर्वी 1939 मध्ये तिची देशवासी जॅडविगा जेद्रेवस्काने या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले होते. 1968 नंतरच्या ओपन युगात एखाद्या ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठणारी ती पोलंडची दुसरी महिला आहे. याआधी 2012 मध्ये तिची देशवासी ऍग्निस्का रॅडवान्स्काने विम्बल्डन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. याशिवाय या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविणारी ती बिगरमानांकन असलेली सातवी खेळाडू आहे. याआधीच्या सहापैकी फक्त एलेना ओस्टापेन्कोने 2017 मध्ये येथील स्पर्धा जिंकली होती.