प्रोत्साहन पॅकेजमुळे देशात स्टीलचा खप वाढलाः स्थानिक, आंतरराष्ट्रीय मागणी वाढतीच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रांसाठी महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱया पोलादाच्या किंमती आता लवकर घटणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. साधारण दोन वर्षे तरी किंमती कमी होणार नसल्याचे बोलले जात आहे. उत्पादनाच्या तुलनेत मागणी अधिक वाढल्याने किंमती आता खाली येणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.
पोलादाच्या किंमती आता कमी होणाऱया नाहीत. यामुळे सर्वसामान्यांची मात्र निराशा होणे साहजिकच आहे. कारण स्टीलच्या मागणीत सध्याला सातत्याने वाढ होताना दिसते आहे. जेव्हा मागणी वाढते तेव्हा शक्यतो दर कमी होत नाहीत, असं सहसा दिसून येतं. हेच पोलादाच्या किंमतीबाबतचं सध्याचं चित्र दिसून येत आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. आर. शर्मा यांनी सांगितले की, पोलादाच्या किमती खाली येण्यासाठी आता ग्राहकांना 2 वर्षे थांबावे लागेल. चालू आर्थिक वर्षात देशात पोलादाची मागणी उत्पादनापेक्षा अधिक दिसून येऊ शकते.
चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2020-21 मध्ये पोलादाची मागणी 140 ते 150 दशलक्ष टन इतकी राहू शकते. उत्पादन 125 दशलक्ष टन राहण्याची शक्यता सांगितली जात आहे. सध्याला दर कमी होण्याची शक्यता धुसर आहे. एप्रिलमध्ये हॉट रोल्ड कॉईलचा दर प्रति टन 58 हजार रुपयांवर पोहचला आहे. एक वर्षाच्या आधीच्या तुलनेत मागणीचा कल पाहता मागणी 50 टक्के अधिक वाढली आहे.
2021-22 मध्ये मागणी वाढणार
चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पोलादाची मागणी वाढती राहणार आहे. स्थानिक स्तरावर 140 ते 150 दशक्ष टन पोलादाची मागणी राहू शकते. पोलादाचे उत्पादन 125 दशलक्ष टन इतके राहू शकते. यावर्षी सर्वाधिक उत्पादनही नोंदलं जाण्याची शक्यता असून मागणीही जास्त दिसणार आहे.
आर्थिक पॅकेजची मदत
भारतासह इतर अधिकतर देशांनी प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली होती. याने पोलादाचा खप वाढण्यास मदत झाली. कॅलेंडर वर्ष 2020 मध्ये एक चीन सोडला तर इतर देशांमध्ये पोलादाची मागणी खूप कमी राहिली होती. यावर्षी भारतीय पोलाद उद्योगाचा विकास 10 टक्के कमी दिसला होता. पण आता विविध उद्योगांनी वेग घेतला असल्याने पोलाद मागणीत राहणार आहे.